मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदारांची हायव्होल्टेज बैठक घेण्यात आली. या बैठकीत युतीधर्मावर सेनेच्या मंत्र्यांनी त्यांच्या असलेल्या नाराजीला वाचा फोडली. नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये यासाठी ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे (Eknath Shinde) केल्याची माहिती आहे. तडजोडी कराव्या लागतात, पण खासदारांवर अन्याय होणार नाही असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना आणि नेत्यांना विश्वास दिल्याचं समजतंय.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी खालील सहा मुद्दे मांडले,
1. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी बैठकीत नाराजीला वाचा फोडली.
2. धाडस करून उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळं मिळाली असं मत अनेक आमदारांनी व्यक्त केलं.
3. त्यामुळे आपलं महत्त्व कमी होत नाही असं मत या आमदारांनी बैठकीत मांडल्याचं समजतंय.
4. परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युतीधर्म पाळला. पण आपले मित्रपक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळत आहेत का?
5. रायगड, शिरूर हे मतदारसंघ आपल्या हक्काचे असतानाही मित्रपक्षाला देऊन आपण अपमान गिळून प्रचार सुरू केला आहे.
6. ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर अजिबात सोडू नये, पालघरही मित्रपक्षांना देऊ नका.
ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत यावर चर्चा केली. इतर पक्ष आपल्या जागेवर दावा करतात त्यावर आमदारांनी आग्रही भूमिका मांडली. ही निवडणूक लढवताना इतर पक्षातील नेत्यांशी कसे संबध असावेत यावर चर्चा झाली. काही अडचणी येत असतील तर एक वेगळी विंग तयार केली आहे. तीनही पक्षाचे प्रतिनिधी एकमेकांशी संपर्क साधत राहतील. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची आहे, जी जिंकायची आहे असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.
भाजप मोठा भाऊ, एक-दोन जागा जास्त लढवल्यामुळे फरक नाही
सगळीकडे थोड्या कुरघोरी असतात, पण शिंदे साहेबांनी सांगितले की वरिष्ठ पातळीवर चर्चा होइल असं संजय शिससाट म्हणाले. ते म्हणाले की, युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा काही शेअर द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा. आम्हांला मोदींना पंतप्रधान करायचं आहे. कोणी किती जागा लढवल्या त्याने फरक पडत नाही. भाजप हा मोठा भाऊ असल्यामुळे त्याने एक दोन जागा जास्त लढवल्या तर फरक पडत नाही
ज्यांना आपण तिकिट दिली नाही त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे केलं जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
ही बातमी वाचा: