Andheri East Bypoll Election: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, त्यासाठी त्यांनी दिलेला राजीनामा अद्याप पालिकेकडून स्वीकरण्यात न आल्यामुळे लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. बुधवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर लटके यांची याचिका सादर करण्यात आली. 


अंधेरी पूर्व विधानसभा मतदान संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर येत्या 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. सुरुवातीला लटके यांनी या निवडणुकीकरता पालिकेकडे दिर्घ रजेची मुभा मागितली होती, मात्र ती पालिकेने नाकारली. तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी मुंबई पालिका प्रशासनाकडे आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. तो राजीनामा तातडीनं मंजूर करावा यासाठी त्यांनी नियमानुसार एका महिन्याचे वेतनही पालिका कोषागारात जमा केलं. मात्र पालिका प्रशासनानं अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. 


पालिकेच्या या वेळकाढूपणामुळे ऋतुजा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यानं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावलेत. पालिकेनं आपला राजीनामा मंजूर करावा, अशी मुख्य मागणी याचिकेतून त्यांनी केली आहे. 3 ऑक्टोबर रोजी पालिकेकडे राजीनामा दिला होता. मात्र, अद्यापही तो राजीनामा स्वीकारलेला नाही. तो तातडीने स्वीकारत एक महिन्याचा नोटीस कालावधी माफ करण्याची मागणीही याचिकेत ऋतुजा लटके यांनी याचिकेतून केली आहे. येत्या शुक्रावारी या पोटनिवडणुकीककता उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्यानं या याचिकेवर गुरुवारीच हायकोर्टाचा निर्णय येणं अपेक्षित आहे.


दरम्यान, ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 30 दिवसात ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. यातच निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत केवळ दोन दिवस उरली आहे. यामध्ये ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीविषयी अजूनही संदिग्धता कायम आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: