Beed News : "मला गर्दी करणारे आणि खोटं बोलणारे कार्यकर्ते नको," असं वक्तव्य असं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केलं. "मी दौरा काढल्यापासून अनेक नवनवीन विद्यार्थी आणि तरुण कार्यकर्ते मनसेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत. ते मला भेटत आहेत. परंतु गर्दी करणारे आणि खोट बोलणारे कार्यकर्ते मला नको. त्यामुळे मी अनेकांच्या भेटी घेत आहे आणि पक्ष वाढीसाठी नवीन तरुणांना देखील संधी दिली जात आहे, असं म्हणाले. ते बीडमध्ये (Beed) बोलत होते.
अमित ठाकरे बीडमध्ये
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यातील शुक्रवारी (7 ऑक्टोबर) तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. मराठवाडा दौऱ्यात अमित ठाकरे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात पोहोचले. अमित ठाकरे काल संध्याकाळी परळीमध्ये पोहोचले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर अमित ठाकरे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शन घेतलं. तर आज कंकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते बैठकीत सहभागी होतील आणि त्यानंतर नारायण गड आणि भगवानगडावर जाऊन देखील ते दर्शन घेणार आहेत.
परभणीत माविद्यालयीन तरुणांशी संवाद
याआधी 11 ऑक्टोबर रोजी त्यांनी परभणीतील फर्न हॉटेलच्या सभागृहात महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. "मुंबईत राहून तुमचे प्रश्न कळणार नाहीत. त्यामुळेच मी इथे तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी आलो आहे. पुढच्या काळात एक मोठी युवा शक्ती आपल्याला उभी करायची असून त्यासाठी सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसोबत यावे, असं आवाहन अमित ठाकरे यांनी यावेळी केलं.
दसरा मेळावा पाहिला का, अमित ठाकरे म्हणाले...
दरम्यान मराठावाडा दौऱ्यापूर्वी अमित ठाकरे सोलापुरात होते. शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे झाले. शिवाजी पार्कच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. याविषयी अमित ठाकरे यांना प्रश्न विचारला असता मेळावे झालेत का, मी पाहिले नाही, असं म्हणत त्यांना अधिक बोलणं टाळलं.
विद्यार्थी सेनेची जबाबदारी मिळाल्यानंतर राज्यभर दौरा
महाराष्ट्र निवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित ठाकरे सांभाळत आहेत. ही जबाबदारी मिळाल्यानंतर ते राज्यभर दौरा करत आहेत. अमित ठाकरे यांना यापूर्वी केलेल्या मुंबई, कोकण, ठाणे, पालघर आणि नाशिक दौऱ्यात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठवाडा दौऱ्याआधी त्यांनी पुण्याचा दौरा केला होता. तर मराठवाडा दौरा आटोपल्यानंतर ते विदर्भाचा दौरा करणार आहेत.