Andheri East Bypoll Election 2022:  अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी केला आहे. शिवसेना या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. 


शिवसेनेचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नियमांनुसार, महापालिकेकडे राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा मंजूर न करण्याचे तंत्र वापरले जात असल्याचा आरोप परब यांनी केला. नियमांनुसार, ऋतुजा लटके या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असून त्यांचा राजीनामा आयुक्तांपर्यंत न जाता विभागीय पातळीवर मंजूर होणे आवश्यक होते असेही परब यांनी म्हटले. 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी आपल्या लिपीक पदाचा राजीनामा दिला. नियमाने राजीनामा दिल्यानंतर सेवा समाप्तीस एक महिना पूर्ण होत नसल्यास एक महिन्याचा पगार कोषागरात जमा करावा लागतो .ऋतुजा लटके यांनी सर्व कागदपत्रे सादर केले असून त्यांची फाइल तयार आहे. मात्र,  त्यांना राजीनामा चुकीच्या पद्धतीने देण्यात आला असल्याचे एक महिन्याने सांगण्यात आले. राजीनामा चुकीच्या पद्धतीने असता तर त्याच वेळेस त्यांना कल्पना का दिली गेली नाही, असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला.


महापालिका आयुक्तांवर दबाब


शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप परब यांनी केला. आपण स्वत: महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र, त्यावेळेस त्यांनी उडवीउडवीची उत्तरे दिली. ऋतुजा लटके या तृतीय श्रेणीतील पालिका कर्मचारी आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार सहाय्यक आयुक्तांना आहे. तरीदेखील हे प्रकरण आयुक्तांकडे कसे गेले, असा सवालही परब यांनी उपस्थित केला. 


शिवसेना पोटनिवडणूक लढणार, सर्व प्लान तयार 


शिवसेना अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूक लढवणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. ऋतुजा लटके ह्या माझ्या सतत संपर्कात आहेत. त्यांनी कोणाचीही भेट घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून या पोटनिवडणुकीसाठी सर्व प्लान तयार असून योग्यवेळी निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या: