PM Modi Pune Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाले. यानंतर पंतप्रधानांनी स्वतः मेट्रोचं तिकीट काढत प्रवास केला. यावरच बोलताना विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज पुण्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण आज पुण्याची आपली मेट्रो धावली आहे. या मेट्रोचं पाहिलं तिकीट स्वतः पंतप्रधानांनी मोबाईलद्वारे पेमेंट करून काढलं आणि त्यात प्रवास केला. पंतप्रधानांनी स्वतः तिकीट काढून प्रवास केला असताना आम्ही विनातिकीट प्रवास केल्याने संकोच वाटत असल्याचंही ते म्हणाले. विनातिकीट प्रवास केल्याने मेट्रो प्रशासनाने नंतर आमच्याकडूनही पैसे वसूल करून घ्यावे असं, पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुणे मेट्रोचे काम विक्रमी वेळेत झाले
मेट्रोचं काम पूर्ण होताना अनेक अडचणी होत्या. मात्र महामेट्रोने विक्रमी वेळात हे काम पूर्ण केल्याचं सांगत फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, महामेट्रोने पुणे मेट्रोत सर्वात महत्वाची गोष्ट ही केली की, ही देशातील पहिली अशी मेट्रो आहे, ज्याचे नॉन फेअरबॉक्स महसूल हे जवळपास 50 टक्के असेल. मेट्रो हे नवीन मॉडेल आज पुणे मेट्रोने देशासमोर ठेवलं असल्याचं ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, पुण्याची जी गंगा आहे, त्याला पवित्र करण्यासाठी तुम्ही (पंतप्रधानांनी) आम्हाला जो जायकाचा प्रकल्प मंजूर करून दिला आहे. आज त्याचंही भूमिपूजन केलं जाणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून पुण्यातील नद्यांमधे एक थेंब देखील प्रदुषण राहणार नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. तसेच पुणे महापालिका इथून पढे सगळी सार्वजनिक वाहतूक बायो फ्युएलवर सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या: