Deputy cm Ajit Pawar : मला पंतप्रधान नरेंद्र मोंदीना एक लक्षात आणून द्यायचे आहे, की गेल्या काही दिवसांपासून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. मोठ्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला. शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊंच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहाय्याने समाजकार्य केले. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करम्यात आला. एकूण 33 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदींनी पुणे मेट्रो आराखड्याची पाहणी केली. यानंतर मोदींनी मेट्रोचं मोबाईल तिकीट देखील काढले. महामेट्रोच्या नव्या अॅल्युमिनियम निर्मित वजनाने हलक्या कोचमधून गरवारे कॉलेज ते आनंदनगर दरम्यान पुणे मेट्रोतून मोदींनी प्रवास केला. यावेळी शाळकरी विद्यार्थी आणि दिव्यांगांसोबत मोदींनी संवाद साधला. 


यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे पुण्यातील जनतेच्या राज्याच्या वतीने स्वागत केले. ही भुमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी सहकार्य केले त्यासाठी तुमचे आभार मानतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले. पुणेकरांच्या सहनशिलतेला दाद द्यावी लागेल. कारण बारा वर्षांपुर्वी या मेट्रोला परवानगी मिळाली होती, पण काही कारणांनी काम सुरु झाले नाही. काही लोकप्रतिनिधींकडून मेट्रो इलेव्हेटेड करायची की अंडरग्राऊंड करायची यासाठी वेळ लावण्यात आला. त्यामुले मेट्रोचे काम सुरु होण्यास अवधी लागल्याचे अजित पवार म्हणाले.


दरम्यान, आताच्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण होण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली असा विस्तार होण्याची गरज असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. नदी सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नदीची सुरक्षीतता, पर्यवरणाचे रक्षण जैववैविध्य, याचा विचार करावा लागणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.