हिंगोली : विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना विधानपरिषदेची उमेदवारी (Vidhan Parishad Election) जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून आमदारकीची संधी मिळाली आहे. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस पक्षातील नाराजी समोर आली आहे. या उमेदवारीवरुन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीमध्ये 90% मते मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या बाजूने दिली आणि मराठवाड्यातील आठपैकी 7 जागा महाविकास आघाडीला निवडून दिल्या. तरी, अल्पसंख्यांक नेत्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. याशिवाय प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार केल्याची तक्रार हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली होती. तरी देखील त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मान खालावली आहे. पक्षाने मुस्लिम समाजाच्या अपेक्षा आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाची उपेक्षा केली आहे. त्यामुळे, आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं अब्दुल हफिज यांनी राजीनामा पत्रामध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे हाफिज यांनी नाना पटोलेंची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
नागेश आष्टीकर यांचाही उमेदवारीला विरोध
हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे, त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती. नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम यांचा दारुण पराभव केला होता.दरम्यान, प्रज्ञा सातव यांनी लोकसभेत आघाडी धर्म पाळला नाही, असा आरोप आष्टीकर यांनी सातत्याने केला आहे.
हेही वाचा
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा