मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरुन चांगलंच रणकंदन माजलं आहे. या मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) केवळ 48 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे, येथील मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांनी केला होता. त्यानंतर, येथील मतमोजणीवेळी ईव्हीएम मशिनसंदर्भात ओटीपी कोणाच्या मोबाईलवर आला, रवींद्र वायकर यांचा मेव्हणा तिथे काय करत होता, अशा अनेक प्रश्नांमुळे निकालावर संशय व्यक्त करण्यात येत आहेते. त्यावर, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर (Gajajan Kirtikar) यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. तसेच, निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत स्वत:च्या मुलासाठी प्रचार न केल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. 


मी अमोल आणि उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले, तुमच्या मनात जो संशय आहे त्याची चर्चा करत बसू नका. आता, थेट हायकोर्टात जा तिथे जो काही निर्णय येईल तो मान्य करा, असे गजानन कीर्तीकर यांनी म्हटले. तसेच, एक मात्र स्पष्ट झाले की, वंदना सूर्यवंशी या भ्रष्ट अधिकारी असून त्यांची नेमणूक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी का केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना अशी नेमणूक का केली याचे उत्तर द्यावे लागेल, अशा सवालही कीर्तीकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे, गजानन कीर्तीकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 


तो उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून आला असता


जो निकाल लागला तो स्वीकारायचा याबद्दल काही दुमत नाही. माझ्या पक्षाचा उमेदवार जिंकला, पण मी रवींद्र वायकर यांचा प्रचार केला नाही आणि अमोलचाही प्रचार केला नाही. मी ज्याचा प्रचार केला असता तो 50 हजारांच्या फरकाने जिंकून आला असता, 48 मतांनी आला नसता. मी अमोलचा प्रचार कसा करणार? मी स्तब्ध राहिलो, कोणाचाही प्रचार केला नाही, अशी खंतही गजानन कीर्तीकर यांनी मुलाप्रती व्यक्त केली. 


अजित पवारांच्या सहभागावरुन रामदास कदमांचे समर्थन


मी रामदास कदम यांच्या मताशी सहमत आहे, जर आधी जागा जाहीर झाल्या असत्या तर सातच्या ऐवजी आणखी 4 ते पाच 5 आल्या असत्या, अतिशय स्पष्ट मत त्यांनी मांडले त्याला माझे समर्थन आहे, असे म्हणत एकप्रकारे अजित पवारांच्या सहभागामुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याचंही त्यांनी सूचवलं आहे. 


शिशीर शिंदेंवर पलटवार


शिशीर शिंदे आधी शिवसेनेत होते, मग मनसे मध्ये गेले, मग पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले. ते दल बदलू आहेत, ते मला निष्ठा काय शिकवणार? असे म्हणत शिशीर शिंदेंनी केलेल्या टीकेवरुनही गजानन कीर्तीकर यांनी पलटवार केला.  


आनंदराव अडसूळ यांच्याप्रती सहवेदना


आनंदराव अडसूळ यांच्या पत्नीचे निधन झाले, आम्ही खूप जुने शिवसैनिक आहोत. ज्यावेळी गृहिणी घरात सक्षम असते त्याचवेळी आम्ही बाहेर लढा देऊ शकतो. पण त्यांच्या गृहिणीचे निधन झाले, त्याबद्दल मी श्रद्धांजली अर्पित करतो, असे म्हणत गजानन कीर्तीकर यांनी आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.