मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Shiv Sena) हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. रवींद्र वायकर हे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच ट्विट करुन, रवींद्र वायकर यांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसंच रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.
गुप्त भेटीनंतर निर्णय?
जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रवींद्र वायकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, हा आमदार नेमका कोण, हे समजू शकले नव्हते. मात्र, आता आमदार रवींद्र वायकर असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती. गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती. त्यानंतर आता रवींद्र वायकर आता शिंदे गटात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकरांच्या गुप्त बैठकीत काय चर्चा झाली?
रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते.
कोण आहेत रवींद्र वायकर? (Who is Ravindra Waikar)
जोगेश्वरी भागातून 1992 मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. 2006-2010 या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यानंतर 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते
VIDEO : रवींद्र वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
संबंधित बातम्या