कोल्हापूर : विरोधा पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यात मोठा राडा पाहायला मिळत आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी मारहाण केलेल्या वरपे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी अंबादास दानवे त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी अंबादास दानवे यांना रोखलं. "मी वरपे यांच्या घरी जाणार आहे. क्षीरसागर यांचे 200 असोत किंवा 2 हजार समर्थक असू देत मी जाणार" असा पवित्रा अंबादास दानवे यांनी घेतला होता. त्याआधी अंबादास दानवे यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Kolhapur SP Mahendra Pandit) यांना झापले होते. राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यामुळे दानवेंनी पोलीस अधीक्षकांना झापलं. 


यानंतर आता अंबादास दानवे हे थेट राजेश क्षीरसागर राहात असलेल्या इमारतीमधील त्यांचे शेजारी असलेल्या वरपे कुटुंबाच्या भेटीला पोहोचले. यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना विरोध केला. राजेश क्षीरसागर हे शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला.   


तुमची मस्ती चालणार नाही


दरम्यान, अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित (Kolhapur SP Mahendra Pandit) यांना फोन करुन झापलं होतं. राजेश क्षीरसागर यांनी मारहाण करुनही त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही अशी विचारणा त्यांनी केली. तसंच तुमची आणि राजेश क्षीरसागर यांची मस्ती अजिबात चालणार नाही, गुन्हा दाखल करा, असं अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षकांना दरडावलं होतं. 


नेमकं प्रकरण काय?


राजेश क्षीरसागर आणि वरपे कुटुंबीयांमध्ये डिसेंबर महिन्यात वाद झाला होता. राजेश क्षीरसागर यांच्या गच्चीत कार्यकर्त्यांच्या पार्ट्या सुरु असतात. त्यामुळे रात्रभर जोरजोरात आवाज सुरु असतो. यावरुन राजेंद्र वरपे त्यांना समजवायला गेले तेव्हा क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने वरपेंना मारहाण केली होती. त्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 


यासंदर्भात वरपे यांच्या मुलीने एका व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली फिर्याद मांडली होती. मुख्यमंत्री साहेब, तुमचे जवळचे सहकारी राजेश क्षीरसागर हे आम्हाला वारंवार त्रास देत आहेत. त्यांना आमचे घरे हवे असल्याने त्यांचा त्रास वाढतच चालला आहे. तुम्ही आम्हाला तुमचं घर विका आणि इथून निघून जा, असंही वारंवार सांगण्यात येत आहे, असं या व्हिडीओमधून सांगितलं होतं.


VIDEO :  अंबादास दानवे यांनी राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केलेल्या कुटुंबाची भेट घेतली



 


संबंधित बातम्या 


Rajesh Kshirsagar: SP साहेब, तुमची आणि राजेश क्षीरसागरांची मस्ती चालणार नाही, अंबादास दानवेंनी फोन करुन झापलं!