कोल्हापूर: पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या डॉ. अजय तावरेला भरचौकात फाशी दिली पाहिजे. महाराष्ट्रातील पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. राज्यात सगळ्याच विभागात भ्रष्टाचार सुरु आहे. महसूल असो किंवा गृहखाते असो, हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत, अशी टीका काँग्रेस पक्षाचे पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


या पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर यांना पुण्यातील अपघात  प्रकरणाविषयी विचारण्यात आले. त्यावर धंगेकर यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. 'उडता पंजाब' सारखं 'उडतं पुणे' किंवा 'उडता महाराष्ट्र' म्हणायची वेळ आली आहे. लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो. पुण्यातील पब संस्कृती थांबली पाहिजे, ही भूमिका आहे. पुण्यामध्ये देशभरातील सर्व शहरातून मुलं शिकण्यासाठी येत आहेत. इतर देशातील शहरातून येणाऱ्या मुलांच्या पालकांचे फोन येत आहेत. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही हे लक्षात आल्यावर दोन पोलीस निलंबित केले. धनिकपुत्राचे रक्त फेकून देण्यापर्यंत गुन्हा लॅबमधील डॉक्टरांनी केला. पोलिसांनी चांगला तपास केला आहे, पण अजूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असे दिसत असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.


मी पुणेकर, कोणालाही घाबरत नाही: रवींद्र धंगेकर


पैसे टाकून सिस्टीम विकत घेऊ शकतो, ही त्या श्रीमंतांची भूमिका होती. आम्ही मंत्र्यांवर टीका केल्यानंतर त्यांना माझा राग आला. मी हसन मुश्रीफ यांची माफी मागतो, पण पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे. पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही. मी कुणाला घाबरत नाही, नोटीस द्या नाहीतर, आणखी काही करा. ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही. सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी मला धमकी देऊ नये. धंगेकर हा घाबरणारा माणूस नाही. मी पुणेकर आहे, घाबरणार नाही, असे रवींद्र धंगेकरांनी यावेळी ठणकावून सांगितले.


रवींद्र धंगेकरांचं हसन मुश्रीफांना चॅलेंज


पुण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या संरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार.  हसन मुश्रीफ यांच्या काळात डॉक्टर कसे वागतात, हे त्यांना माहिती आहे. 
काळे याला बाजूला करून आपल्या मनाचा अधिकारी त्याठिकाणी आणला जातोय का, अशी शंका येत आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर उतरणार. मला नोटीस पाठवण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी बंद करा. मी मंत्र्यांच्या मतदारसंघात, मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन माझं म्हणणं मांडणार आहे. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करून पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाही, मी जेलमध्ये जाईन, असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.


आणखी वाचा


रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे पुणे एक्साईज कार्यालयात, अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का, हप्तेखोरीची यादी वाचून दाखवली!