पुणे: पुण्यातील अपघात प्रकरणानंतर शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरुन रान उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोमवारी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ  अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) अधिकाऱ्यांनी तुमचे सर्व आरोप साफ चुकीचे आहेत, असे म्हटले. त्यांच्या आरोपानंतर आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी त्यांना फैलावर घेतले. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उदध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, अशा एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती रवींद्र धंगेकर यांनी केली.


यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणार्‍या पोलिसांची नावे वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे तुमच्या आशीवार्दाने हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला. 


 



सुषमा अंधारे, धंगेकरांनी पब आणि हॉटेल्सच्या हप्त्यांची यादीच वाचून दाखवली


द माफिया- 1 लाख रुपये
एजंट जॅक्स प्रत्येक आऊटलेटमागे प्रत्येकी 50 हजार रुपये
टू बीएचके- 1 लाख
बॉलर- २ लाख 
राजबहादूर मिल्स बिमोरा- १ लाख
मिल्ट- १ लाख
टीटीएम रुफटॉप- ५ हजार
स्काय स्टोरी -५० हजार
जिमी दा ढाबा- ५० हजार
टोनी दा ढाबा- 50 हजार
आयरिश- ४० हजार
टल्ली टुल्स- ५० हजार
अॅटमोस्पिअर- 60 हजार
रुड लॉर्ड - ६० हजार
24 के- दीड लाख
कोको रिको हॉटेल- 71 हजार रुपये


ठाकरे आणि काँग्रेसच्या शिलेदारांचा हल्लाबोल


पुणे अपघात प्रकरणानंतर काँग्रेस आमदार राज्य सरकारविरोधात रान उठवत आहेत. सोमवारी त्यांना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची साथ मिळाली. सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावरुन महायुतीच्या मंत्र्‍यांना धारेवर धरले. पुण्यात दर 15 दिवसांनी गांजा आणि ड्रग्ज सापडत असेल तर उत्पादन शुल्क विभाग काय करतोय? संबंधित खात्याच्या मंत्र्‍यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का? अधिकारी त्यांचे आदेश ऐकत नाहीत का?, असे सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना लक्ष्य केले. आम्ही काही बोललो तर एक्साईज खात्याचे मंत्री आणि आरोग्य प्रशासन विभागाचे मंत्री आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा करतात. आमच्यावर केस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोला, असे खडेबोल सुषमा अंधारे यांनी संबंधित मंत्र्यांना सुनावले. 


आणखी वाचा


अग्रवाल कुटुंबाविरोधात आणखी एक तक्रारदार समोर, 84 लाख रुपये थकवल्यानं मुलाची आत्महत्या, दत्तात्रय कातोरेंची पोलिसांत धाव!