बुलढाणा : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणशिंग पुढील काही दिवसांत फुंकले जाणार असून राजकीय पक्षांसह अपक्ष आणि मतदारसंघातील इच्छुक नेतेही कामाला लागले आहेत. आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या पक्षाकडून आपणास तिकीट मिळेल, कोणत्या पक्षातून विजयी होण्याची जास्त शक्यता आहे, या सर्वांचा अभ्यास करुन उमेदवारही पक्षांतर करताना दिसून येतात. बुलढाण्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) घेतली. याबाबत, आता त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनीच माहिती दिली आहे. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक झाल्याची बुलढाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच, रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर याही निवडणूक रिंगणात उतरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत, एबीपी माझाने शर्वरी तुपकर यांच्यासमवेत संवाद साधला. ''काल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यावर आज बुलढाण्यात उत्साहाच वातावरण बघायला मिळालं. काल महविकास आघाडीने रविकांत तुपकर यांना पाठिंबा दिल्यास चांगलच होईल, असं मत रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केलंय. तसेच, उद्धव ठाकरे यांना भेटल्याची माहिती आहे, मात्र  भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील मला कळलं नाही. महविकास आघाडीने रविकांत यांना पाठिंबा दिला असेल तर नक्कीच चांगल होईल. आज कार्यकर्ते उत्साहात आहेत, बुलढाणा मतदारसंघात जनतेला बदल हवाय, त्यामुळे कार्यकर्ते खुश आहेत आणि कामाला लागले आहेत, असेही शर्वरी यांनी म्हटलं. बुलढाण्यात आग्या मोहोळ उठवायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल.. अशा घोषणा आता कार्यकर्ते देत आहेत. मात्र, मी विधानसभा निवडणूक लढवावी का हे माझे सहकारी व शेतकरी ठरवतील, तेच तसा निर्णय घेतील, असेही शर्वरी तुपकर यांनी बोलताना स्पष्ट केले. 


लोकसभेला रविकांत यांना अडीच लाख मतं


 बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर आगामी काळात रविकांत तुपकर हे महाराष्ट्र दौरा करत असून जवळपास 25  जागांवर उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. लोकसभेला बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. यावेळी त्यांचा निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मत घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून  महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होत असल्याची माहिती आहे.


हेही वाचा


काँग्रेसचा बडा नेता वंचितच्या गळाला; आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी