रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांतील लोकांनी  तीनवेळा मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झालेल्या विनायक राऊत यांना निवडून दिले आणि डॉक्टरेट मिळवलेल्या निलेश राणे (Nilesh Rane) यांना पाडले. निलेश अमेरिकेत शिक्षण घेऊन आला, त्याने इकडे येऊन एम.कॉम केले. त्यानंतर निलेशने पीएचडी केली. पण लोकसभा निवडणुकीत तीनवेळा मॅट्रिकची परीक्षा नापास झालेल्या विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी त्याचा पराभव केला. हे पाहून मला हसायला येतं, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. ते मंगळवारी चिपळूणमध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करता  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 


यावेळी नारायण राणे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यपद्धतीचा अनुभव त्यांनी सांगितला. कुठल्या पेनाने सही झाली की काम होणार हे मला बरोब्बर ठाऊक होते. लघु, मध्यम, सूक्ष्म विभागाच्या कामाचे पंतप्रधान मोदींकडून संसदेत कौतुक करण्यात आल्याचे राणेंनी सांगितले. दिल्लीतील अधिकारी मराठी खासदाराला गुंडाळायला बघतात. मी दमात घेतलं तर अधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली. पण पंतप्रधान मला काही बोलले नाहीत, असे नारायण राणे यांनी सांगितले.


ईडीची धाड पडल्यानंतर उद्धव ठाकरे मागच्या दाराने जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले: नारायण राणे


या कार्यक्रमात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. रामलीला मैदानावरील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, अबकी बार भाजप तडीपार. उद्धव ठाकरे यांचे खासदार किती आणि ते काय बोलतात? ईडीची धाड पडल्यानंतर हेच उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांना मागच्या दाराने जाऊन भेटले होते, असेही नारायण राणे यांनी म्हटले.


कोकणात उद्योग आणेन पण जमिनींना नाही म्हणू नका: नारायण राणे


मी खासदार झालो तर कोकणाचा विकास करेन. कोकणात उद्योग आणेन. पण जमिनीला नाही म्हणू नका. मला सिंधुदुर्गामध्ये खूप त्रास झाला. कोणताही उद्योग आणला की, सिंधुदुर्गातील लोक म्हणतात, 'आमका विकास नको'. विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गात काहीच विकास केला नाही. आधी त्यांनी चिपी विमानतळाला विरोध केला आणि नंतर उद्घाटनाला पुढे आले, असे नारायण राणे यांनी सांगितले.


मी सिंधुदुर्गात आल्यामुळे आज जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 2 लाख 40 हजार: नारायण राणे


माझा जन्म कोकणात झाला तरी माझं बालपण आणि तरुणपणाचा काळ मुंबईत गेला. मी नगरसेवक असताना बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावलं आणि कोकणात जायला सांगितलं. कोकणात शिवसेनेला कोणीतरी नेता हवा, असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यावेळी मला मुंबईचा महापौर व्हायचे होते. मी बाळासाहेब ठाकरे यांना मला कोकणात कशाला पाठवता, असेदेखील म्हणालो. पण नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी तुला कोकणात जावंच लागेल, असे सांगितले. मी कोकणात आलो तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 35 हजार इतके होते. तेच दरडोई उत्पन्न आज 2 लाख 40 हजार इतके झाले आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.


आणखी वाचा


नारायण राणे वाघच, पण राग आला तर त्यांच्या तोंडून चुकीचं वाक्य निघतं; राणेंचं कौतुक करताना दीपक केसरकर काय म्हणाले?