अमरावती : एकीकडे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या सभेसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) हे अमरावतीमध्ये येणार असून दुसरीकडे बच्चू कडू (Bachchu Kadu) मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अमरावतीतील सायन्सकोर मैदान हे आधी बच्चू कडू यांच्या सभेसाठी देण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांची परवानगी रद्द करत ते अमित शाहांच्या सभेसाठी देण्यात आलं. त्यामुळे संतापलेले बच्चू कडू बुधवारी आंदोलन करणार आहेत. आपल्याला अटक करण्याचा प्लॅन राणा दाम्पत्याचा असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू बुधवारी आपली भूमिका ठरवणार
बुधवारी सकाळी 10 वाजता आपल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा स्टेडियमवर उपस्थित राहावे असं आवाहन करत दुपारी आपण आंदोलन करणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. जिल्हा स्टेडियमवरून बच्चू कडू रॅली काढणार असून जर आपल्या सभेला परवानगी दिली नाही तर दीड लाख लोकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठाण मांडणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय.
समाज कंटकाकडून अनुचित प्रकार घडविण्याचे प्रयत्न सुरू आहे असे मॅसेज आम्हाला आले म्हणून दोन पाउलं मागे घेतली. बुधवारी जिल्हाभरातून शेतकरी, शेतमजूर हजारोंच्या संख्येने अमरावतीत दाखल होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.
सायनस्कोर मैदानासाठी बच्चू कडू आणि नवनीत राणा समोरासमोर
अमरावतीत सायन्सकोर मैदानावरून आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. बच्चू कडू यांनी 24 एप्रिलसाठी मैदान बुक केलं होतं. मात्र प्रशासनाने अमित शाहांच्या सभेसाठी बच्चू कडू यांची परवानगी रद्द केली. त्यानंतर मैदानावर पाहणीसाठी आलेले बच्चू कडू चांगलेच संतापले.
आमदार बच्चू कडूंची पोलिसांनी गाडी अडवली. त्यानंतर बच्चू कडूंनी पोलीस उपायुक्तांशी जोरदार हुज्जत घातली. पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, पोलीस गुलाम झाल्यासारखे वागत आहेत अशी टीका कडूंनी केली. राणा दाम्पत्याकडून माझ्या अटकेचा प्लॅन आखण्यात आलाय, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू आणि पोलिसांची बाचाबाची
या आधी 23 आणि 24 तारखेला आपल्याला सायन्सकोर मैदानात आपल्याला सभेची परवानगी देण्यात आल्याचं सांगत बच्चू कडूंनी त्याचे कागदपत्रंही दाखवली. त्यानंतर अमित शाहांच्या सभेसाठी आपली परवानगी रद्द करण्यात आल्याचं सांगत बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिस हे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असून भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.
ही बातमी वाचा: