मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला, गत 2019 च्या निवडणुकांच्या तुलनेत भाजपच्या मोठ्या जागा घटल्या. विशेष म्हणजे शिवसेना पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडून राष्ट्रवादीला सोबत घेऊनही महायुतीला एवढा फायदा झाला नाही. त्यामुळे, अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच भाजपचं नुकसान झाल्याचं बोललं जातंय. भाजपच्या काही नेत्यांकडून जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली जात आहे. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते आम्हाला राष्ट्रवादी सोबत असल्याचा फायदाच झाल्याचं त्यांनी म्हटलंय. आता, भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील अजित पवारांना सोबत घेतल्याने आमचं नुकसान झालं नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी असंगाशी संग केल्याने आमचं नुकसान झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी काही दिवसांपूर्वी एका माध्यम समुहाला मुलाखत दिली. त्यावेळी, अजित पवार आमच्यासोबत आल्याने आमचं नुकसान झालं नसून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमच्यापासून दूर गेल्याने आमचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, माध्यमांनी त्यांना यासंदर्भाने प्रश्न विचारल्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. मी माध्यमांना स्पष्टपणे सांगितलंय, अजित पवार (Ajit pawar) तुमच्यासोबत आल्याने तुमचं नुकसान झालं का, असा प्रश्न मला चॅलेलवाल्यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना मी असं सांगितलं की, अजित पवार आमच्यासोबत आल्यामुळे आमचं नुकसान नाही झालं, उद्धव ठाकरेंनी असंगाशी संग केल्यामुळे आणि वेळीच आम्हाला धोका दिल्यामुळे आमचं नुकसान झालं, असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. 


सन 2019 साली विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सर्वच पर्याय खुले असल्याचे म्हटले. म्हणजेच, त्यांनी काँग्रेससोबत जाण्याची तयारी दर्शवली. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध राजकारण केलं, त्यांच्या विचाराशी ते कधी सहमत होऊ शकले नाही. मात्र, सत्तेच्या लालसे पोटी उद्धव ठाकरेनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमचे सरकार होऊ शकले नाही. उद्धव ठाकरेंनी असंगाशी संग केल्यामुळे आणि वेळीच आम्हाला धोका दिल्यामुळे आमचे नुकसान झाले, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. तर, अजित पवार आमच्यासोबत आल्यामुळे आमचं नुकसान झालं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


2019 नंतर बदललं राजकारण


दरम्यान, 2019 नंतर राज्यातील राजकारण वेगळ्याच वळणावर गेल्याचं पाहायला मिळालं. कधीकाळचे सोबती राजकीय शत्रू बनले आहेत. तर, कधी काळचे मित्र राजकीय शत्रू बनले आहेत. त्यामुळे, राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशा तीन पक्षांच्या युती व आघाड्या निर्माण झाल्या असून आगामी विधानसभेतही याच आघाडीच्या माध्यमातून राजकीय पक्ष मैदानात उतरतील, असेच दिसून येते. 


हेही वाचा


Video: म्हाडाच्या पवईतील लॅव्हिश घराचा व्हिडिओ समोर; जाणून घ्या किंमत; तुम्ही केलाय ना अर्ज