Solapur Lok Sabha : सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काटें की टक्कर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले विद्यमान आमदारांनाच लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक आधीच हाय व्होल्टेज झाली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने देखील आपला उमेदवार जाहीर करून ही लढत आणखी इंटरेस्टिंग केली. वंचित पाठोपाठ आता एमआयएमने देखील आपला उमेदवार देण्याचे निश्चित केले आहेत. त्यामुळे सोलापूरमध्ये यंदा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 


एमआयएम सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे, असे एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितले. सोलापूरसाठी रमजान ईद नंतर उमेदवार कोण असेल याची घोषणा होईल. अशी माहिती फारूक यांनी यावेळी बोलताना दिली. दरम्यान, सोलापूर लोकसभेच्या जातीय समीकरानाचा विचार केला असता लिंगायत आणि मराठा समाजाच्या पाठोपाठ मुस्लिम आणि अनुसूचित जातीतील मोठ्या संख्येने या मतदारसंघात आहे. या समाजाचे मत देखील निर्णायक ठरत असतात. एमआयएमने सोलापूर लोकसभेत उमेदवार दिल्यास काँग्रेसच्या मतांचे विभाजन होईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. याचा थेट फटका आमदार प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे. 


रमेश कदम एमआयएमकडून लढणार ?


मोहोळचे माजी आमदार राहिलेले रमेश कदम यांची एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी  भेट घेतली.  यावेळी रमेश कदम यांच्यासोबत लोकसभा उमेदवारी संदर्भात चर्चा केली. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी देखील रमेश कदम यांच्याशी भेट घेतली होती. त्यामुळे रमेश कदम एमआयएमच्या तिकिटावरून सोलापूर लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. "रमेश कदम यांच्याशी चर्चा झाली आहे, काही गोष्टी आणखी चर्चा व्हायच्या आहेत. रमेश कदम यांच्याशिवाय आणखी चार उमेदवार इच्छुक आहेत, या सर्व नावांचा विचार हायकमांडकडून सुरु आहे, असे शाब्दी यांनी सांगितलं."


2014 च्या निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले रमेश कदम 'मागेल त्याला रस्ता आणि मागेल त्याला पाणी' अशा उपक्रमामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. मात्र 2015 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या घोटाळ्याच्या आरोपात त्यांना तुरुंगात जावं लागलं. मागील जवळपास सात वर्ष तुरुंगातच होते. मात्र काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पुन्हा येण्याची चर्चा आहे. मोहोळ मतदारसंघात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय पंढरपूर मंगळवेढा मध्ये देखील त्यांच्य समर्थकांची संख्या मोठ्या संख्येने आहे. एमआयएमने रमेश कदम यांना संधी दिल्यास मुस्लिम मतांची विभाजन होण्याची शक्यता  नाकारता येत नाही. ज्याचा थेट फटका आमदार प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे.