Ramesh Kadam: मातंग समाजाच्या निर्धार मोर्चाला जाण्यापूर्वीच रमेश कदम स्थानबद्ध; म्हणाले, 'स्वतंत्र आरक्षणाच्या न्यायासाठी...'
Ramesh Kadam: अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी प्रलंबित राहिल्याने मातंग समाजात असंतोष असून आपल्या मागणीसाठी आज राज्यभरातून मातंग बांधव मुंबईत धडकणार आहेत.

Ramesh Kadam: अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी प्रलंबित राहिल्याने मातंग समाजात असंतोष असून आपल्या मागणीसाठी आज राज्यभरातून 5 लाख मातंग बांधव मुंबईत धडकणार आहेत. सकल मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार असून उपवर्गीकरणाचा शासन निर्णय (जीआर) जारी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मात्र, या मोर्चापूर्वीच मोठी राजकीय घडामोडी घडली आहे.
माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून (Kasturba Marg Police Station) आज सकाळी 7 वाजता त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या मोर्चाला जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. या कारवाईमुळे मातंग समाजात तीव्र असंतोष पसरला असून राजकीय वातावरण तापले आहे.
Ramesh Kadam: मातंग समाजाचा लढा आणि 82 शिफारशींचा अहवाल
स्थानबद्धतेच्या कारवाईनंतर रमेश कदम यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, मातंग समाजाला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र आरक्षणाचा न्याय मिळावा, यासाठी 'क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या' माध्यमातून 82 शिफारशींचा अनुभवाधारित अहवाल सप्टेंबर 2008 मध्ये शासनाला सादर करण्यात आला होता. पुढे यातील 68 शिफारशींना राज्य मंत्रिमंडळाने मान्यताही दिली होती.
Ramesh Kadam: 'अंडरट्रायल कैदी म्हणून 8 वर्षे गेली, पण लढा थांबणार नाही'
आपल्या भावना व्यक्त करताना कदम पुढे म्हणाले, "माझ्या आयुष्यातील जवळपास आठ वर्षे अंडरट्रायल कैदी म्हणून तुरुंगात गेली. त्यामुळे या अहवालाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी समाजात राहून लढा देण्याची संधी माझ्यापासून हिरावली गेली. पण आजही माझी भूमिका तीच आहे. मातंग समाजाच्या हक्कासाठी, उपवर्गीकरणासाठी आणि स्वतंत्र आरक्षणाच्या न्यायासाठी माझा संघर्ष सुरूच राहील. मला स्थानबद्ध करता येईल; पण मातंग समाजाच्या न्यायाचा आवाज स्थानबद्ध करता येणार नाही," असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
Ramesh Kadam: मातंग समाज काय भूमिका घेणार?
रमेश कदम यांना ऐनवेळी स्थानबद्ध केल्यामुळे आता "रमेश कदम यांच्या अनुपस्थितीत मातंग समाजाचा निर्धार मोर्चा पूर्व नियोजित वेळेत पार पडणार का?" आणि "पोलीस प्रशासनाच्या या कारवाईनंतर मातंग समाज आता काय भूमिका घेणार?" याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
Before You Go
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..






















