शिर्डी : अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भाजपच्या (BJP) वाट्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच, केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भुजबळांना आपल्या आरपीआय (RPI) पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. 'छगन भुजबळ भाजपमध्ये आल्यास स्वागत, पण भाजपपेक्षा ते आरपीआयमध्ये आल्यावर देखील त्यांच्या स्वागतच असणार असल्याचे' आठवले म्हणाले आहेत. रामदास आठवले हे आज शिर्डीच्या दौऱ्यावर असून, साई बाबांचे दर्शन घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


दरम्यान यावेळी बोलतांना आठवले म्हणाले की, "लोकसभेसाठी मी साई बाबांच्या दर्शनाला आलो नाही. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. सर्वधर्म समभावाची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. मला हिंदू धर्माचे लोक जिथे बोलावतात मी तिथे जातो. सर्व धर्मियांनी गुण्या गोविंदाने राहावे ही बाबासाहेबांची इच्छा होती. तसेच, संधी मिळाली तर शिर्डी लोकसभा लढण्यास मी इच्छुक आहे. लोकसभेत संधी मिळाली तर पुन्हा मंत्रीपद नक्की मिळेल. संधी मिळाली तर या भागाचा विकास करणार आहे. मी लोकसभेचा माणूस असून,  2009 साली शिर्डीत काही गैरसमजातून माझा पराभव झाला होता. मात्र, आता मी केंद्रात मंत्री आहे.  पुन्हा शिर्डी लोकसभा लढवावी यासाठी अनेक लोक आग्रही असल्याचे," आठवले म्हणाले. 


भुजबळ आरपीआयमध्ये आल्यास स्वागतच...


दरम्यान यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “छगन भुजबळ हे ओबीसी प्रश्नासाठी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. ओबीसींच्या प्रश्नांवरूनच त्यांनी शिवसेना सोडली होती. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे. ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे, पण भाजपपेक्षा ते आरपीआयमध्ये आले तर स्वागतच असेल. आम्ही सावध आहोत. आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची पूर्वी पासूनची भूमिका असल्याचे" आठवले म्हणाले आहेत. 


मोदींना शिव्या देण्याचं काम विरोधक करताय 


विरोधकांना टिका करण्यापलीकडे काही उद्योग नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं काम विरोधक करताय. मोदींच्या विरोधात जेवढ बोलतील तेव्हढा मोदींनाच फायदा होणार आहे.  नरेंद्र मोदी सर्व धर्मियांना न्याय देणारे असल्याचे देखील आठवले म्हणाले आहेत. 


विकासासाठी पवारांनी मोदींसोबत यायला हवे होते...


अलीकडे राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण बघायला मिळतय. पक्षाचे नेते आमदार सांभाळू शकले नाही म्हणून ते फुटले,  उध्दव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला असता तर चाळीस आमदार फुटले नसते.  देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी मोदींच्या सोबत यायला हवे होते. भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय 2014 ला राष्ट्रवादीने घेतला होता. आता शरद पवारांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेणं योग्य नाही. त्यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला असता, तर त्यांचाही पक्ष फुटला नसता. आम्ही त्यांना फोडले नाही, तर आमदार आमच्याकडे आले. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार असून, पक्ष फोडल्याचा आरोप अत्यंत चुकीचा असल्याचे आठवले म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'राजीनामा देऊन उपकार केले का?, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल