सोलापूर : राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या सोलापूर लोकसभा (Solapur) मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही येथील उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. त्यामुळे, भाजपा नेत्यांचा व पदाधिकाऱ्यांचा विश्वास बळावला असून आमदार प्रणिती शिंदेना पराभूत करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीनेही राम सातपुतेंच्या (Ram Satpute) पराभवाचं मिशन हाती घेतलं असून शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही प्रणिती शिंदेंसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी, येथील महायुतीचा उमेदवार हे बाहेरचं पार्सल आहे, त्याला बाहेरच पाठवा, असे आवाहन सोलापूरकरांना केले. त्यानंतर, आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना राम सातपुतेंनी मराठा समाजाचा अपमान केल्याचं म्हटलं आहे.
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा आमदार राम सातपुते यांनी केली आहे. मात्र, एकीकडे भाजपाप्रणित महायुती सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याचं सांगितलं जात असताना, दुसरीकडे भाजपाचेच आमदार अशाप्रकारची घोषणा करतात,हा दुटप्पीपणा असल्याचं काही मराठा समाजबांधवांकडून सांगण्यात येतं. त्यातच, आज सोलापूर दौऱ्यावर असलेल्या नाना पटोलेंनी राम सातपुतेंनी मराठा समाजाचा अपमान केल्याची आठवण सांगितली. यावेळी, नेमकं काय घडलं होतं, हे त्यांनी सांगितलं नाही. मात्र, राम सातपुते यांनी दोनवेळा माफीही विधानसभेत मागितल्याचा दाखला पटोलेंनी दिला आहे.
राम सातपुतेंनी दोनवेळा माफी मागितली
राम सातपुते हे सुशील कुमार शिंदेंना दळभद्री म्हणतात, एका ज्येष्ठ नेत्याबद्दल असे विधान केले जाते, याबाबत नाना पटोले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना राम सातपुतेंनी मराठा समाजाचा अवमान केल्याचं त्यांनी म्हटलं. ''विधानसभेत मराठा समाजाचा त्याने धडधडीत अपमान केला होता. आम्ही त्याला माफी मागायला लावली, एकदा नव्हे तर दोनदा. मराठा समाजाने हे पाहिलं पाहिजे, विधानसभेच्या रेकॉर्डला आहे, दोनदा त्याने मराठा समाजाची माफी मागितलीय. केवळ नाव राम ठेवल्याने कोणी भगवान श्रीराम होत नाही,'' असे म्हणत नाना पटोले यांनी राम सातपुते यांच्यावरील प्रश्नावर उत्तर दिले.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
नाना पटोले यांनी सोलापूरमध्ये काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित पक्षप्रवेश समारंभाला हजेरी लावली होती. त्यानतंर, पत्रकार परिषदेतून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, स्थानिक नेते अभिजीत पाटील यांच्या भाजपातील सोबतीवरही भाष्य केलं. अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना, लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्याचं आवाहन केलंय, तर कारखान्याचं मी बघतो, असा शब्द दिल्याचं पटोले यांनी म्हटलं. तसेच, अभिजीत पाटील हा प्रामाणिक माणूस आहे. मात्र, फडणवीसांच्या भूमिकेविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार आहोत. एकाद्याला अशाप्रकारे प्रलोभन दाखवणे चुकीचे आहे, असेही पटोलेंनी म्हटले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा येतोय समोर
दरम्यान, भाजपा नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही मराठा समाज आक्रमक झाल्याचं यापूर्वी दिसून आलं. विशेष म्हणजे, भाजपचे राम सातपुते यांचा मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे चले जावच्या घोषणा देत मराठा बांधवांनी कार्यक्रम उधळून लावला होता. तर, प्रणिती शिंदेंचा ताफा अडवूनही मराठा बांधवांना घोषणाबाजी केली होती. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा मुद्दा सत्ताधारी पक्षातील नेत्यांसाठी अडचणीचा ठरत आहे.
हेही वाचा
निलेश लंकेंचा असाही डाव, ऐन प्रचार हंगामात अण्णा हजारेंची भेट; सांगितलं राज'कारण'