Rajya sabha Rajasthan Election Result: राजस्थानमध्ये आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने 4 पैकी 3 जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 


राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या दोन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. वसुंधरा कॅम्पच्या आमदार शोभाराणी कुशवाह आणि कैलाशचंद मीना यांच्यावर क्रॉस व्होटिंगचा आरोप आहे. मात्र असं असलं तरी राजस्थानमध्ये दोन्ही आक्षेपार्ह मते फेटाळण्यात आली नाहीत. दोन्ही मतांची मोजणी झाली. दोन्ही मतांवरील आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. शोभाराणी यांचे मत काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना गेल्याची चर्चा आहे. मतमोजणी सुमारे 1 तास 23 मिनिटे उशिराने सुरू झाल्याने काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी आणि भाजपचे घनश्याम तिवारी यांना विजयी घोषित करण्यात आले. राज्यसभेतील विजयाने सीएम गेहलोत यांचा लौकिक वाढला आहे.


कोणाला किती मते मिळाली?  


रणदीप सुरजेवाला यांना 43 मते मिळाली.
मुकुल वासनिक यांना 42 मते मिळाली.
घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली.
प्रमोद तिवारी यांना 41 मते मिळाली.
डॉ.सुभाष चंद्र यांना 30 मते मिळाली.


दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजकीयदृष्ट्या आणखी मजबूत झाले आहेत. 2020 मध्ये पायलट कॅम्पच्या बंडानंतरही गेहलोत यांनी आपले सरकार पडण्यापासून वाचवले होते. यावेळी गेहलोत यांनी राज्यसभेच्या 4 पैकी 3 जागा जिंकून धोरणात्मक कौशल्य दाखवले आहे. तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर राजस्थानमध्ये गेहलोत यांचं पक्षात आणखी वर्चस्व वाढलं आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर 2023 ची राजस्थान विधानसभा निवडणूक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशी चर्चा आहे.