PM Modi Meets His School Teacher: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहे. त्यांचा गुजरात दौरा (PM Modi Gujarat Visit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. यावेळी त्यांच्या गुजरात दौऱ्याचे खास फोटो समोर आले आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यात नाही तर त्यांना लहानपणी शिकवलेल्या शिक्षकाला भेटल्याचं दिसत आहे. 


हा फोटो गुजरातमधील नवसारी येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या माजी शाळेतील शिक्षकांची भेट घेतल्याचं दिसत आहे. जगदीश नाईक असे त्याच्या शाळेतील शिक्षकाचे नाव आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान आपल्या शिक्षकांना हात जोडून अभिवादन करत आहेत, तर त्यांचे माजी शाळेचे शिक्षक त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देत आहेत.


कोणत्याही शिक्षकासाठी यापेक्षा आनंदाचा दिवस कोणता असू शकतो, जेव्हा त्यांनी शिकवलेल्या कोणत्याही विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होतो आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे येतो. गांधी टोपी परिधान केलेले आणि पांढरा शर्ट परिधान केलेले जगदीश नायक हे पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत आनंदित दिसत आहेत.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील नवसारी येथे 'गुजरात गौरव अभियाना' दरम्यान 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी मोदी म्हणाले की, आज गुजरात गौरव अभियान आहे. मी मुख्यमंत्री म्हणून इतकी वर्षे काम केले याचा मला विशेष अभिमान वाटतो, पण एवढा मोठा कार्यक्रम आदिवासी भागात कधीच झाला नव्हता. आज मला अभिमान वाटतो.


पंतप्रधान मोदी म्हणाले, "नवसारीच्या या पवित्र भूमीतून मी उनाई माता मंदिरात नतमस्तक झालो. आदिवासी शक्ती आणि संकल्पाच्या भूमीवर गुजरात गौरव अभियानाचा एक भाग होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. गुजरातचा अभिमान, गेल्या दोन दशकांत झालेला झपाट्याने विकास. हा प्रत्येकाचा विकास आहे आणि या विकासातून जन्माला आलेल्या नव्या आकांक्षा डबल इंजिन सरकारची ही गौरवशाली परंपरा प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत. आज मला 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याची संधी मिळाली आहे.''