मुंबई : गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात असं काही घडलंय की, काल कोण कुठल्या पक्षात होतं आणि आज कुठल्या पक्षात आहे याची टोटलच लागता लागत नाही. कारण, काल रात्री एखादा नेता गळ्यात एका पक्षाचं उपरणं घालून फिरत असतो आणि रातोरात अशी काही गणितं फिरतात की तो नेता दुसऱ्या दिवशी भलत्याच पक्षाचा झेंडा घेऊन मिरवताना दिसतो. टांगा पलटी घोडे फरार... बरं हे झालं नेत्यांचं... पण एकाच घरातल्या दोन खुंट्यांना वेगवेगळ्या पक्षांच्या टोप्याही अडकवलेल्या दिसतात. अशाच 'एक घर दोन वासे' स्थिती असणारी काही राजकीय कुटुंबं राज्यात आहेत.  


Rajendra Shingne vs Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंना घरातूनच आव्हान? 


यातली पहिली गोष्ट आहे ती राजेंद्र शिंगणे यांच्या घरातली. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते बुलढाण्याच्या सिंदेखेडराजा मतदारसंघाचे विद्यामान आमदार आहेत. त्यांची सख्खी पुतणी गायत्री शिंगणे या मात्र शरद पवार गटात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बुलढाणा कार्यध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. त्या आता राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्याचं दिसतंय.


गायत्री शिंगणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नुकताच मोर्चा काढला. त्यावेळी सख्खे काका राजेंद्र शिंगणे अजित दादांच्या गटात असताना, तुम्ही शरद पवार गटात कशा आणि राजेंद्र शिंगणेंच्या विरोधात लढणार का? असे प्रश्न विचारले. त्यावर त्या म्हणाल्या की, पवार साहेबांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं नक्की करणार. जनता आता बदल नक्की करेल.


Zirwal vs Gokul Zirwal Dindori : वडील दादांकडे, पुत्र काकांसोबत, झिरवाळ कुटुंबात राजकारण 


हे तर झालं शिंगणे कुटुंबाचं. दुसऱ्या एका कुटुंबातही असेच दोन दोन पक्षांचे नेते आहेत आणि ते म्हणजे नरहरी झिरवाळ आणि गोकुळ झिरवाळ. नरहरी झिरवाळ सध्या अजित पवार गटात आहे. विधानसभेचं उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. मात्र त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ मात्र शरद पवार गटाच्या कार्यक्रमात डेरेदाखल झाला आणि चर्चांना उधाण आलं. इतकंच नाही तर त्याच कार्यक्रमात त्यांना जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे उमेदवारीचे संकेत दिले.


यानंतर खुद्द गोकुल झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महायुतीचा समोर कुणीतरी उमेदवार असणारच आहे. पवार साहेबांनी जर संधी दिली तर वडिलांच्या विरोधातही लढण्यास तयार आहे. 


तर गोकुळ झिरवाळांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, तो माझा मुलगा आहे. गोकुळला आमदार व्हायचं असेल तर दादांना सांगू आणि मी थांबून त्याला आमदार करू. 


खरंतर, कुणाला कुठल्या पक्षाचं धोरण आवडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्याबाबतचं स्वातंत्र्यही ज्याचं त्याला आहे. मात्र तरीही एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात एक घर, दोन वासे असं चित्र दिसू लागलंय.