Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Assembly Election Results 2024 :राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या निवडणुकांवर संपुर्ण देशाचं लक्ष आहे. मराठा आरक्षणाचं केंद्र बनलेल्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरची लढतही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २०१९ सालापासून महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या अनेक उलथापालथींनंतर यंदाची निवडणूक छत्रपती संभाजीनगरमध्ये काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मराठवाड्यातील एकूण ४६ मतदारसंघांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ मतदारसंघ आहेत.१९८९ ते २०१९ या तीन दशकांमध्ये १९९८ च्या निवडणूकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेना भाजप युतीचा खासदार शहरातून निवडून आल्याचं दिसून येतं. मात्र, मागील दोन निवडणूकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदारांचा कौल बदलतानाचे चित्र आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा आरक्षण, लाडकी बहीण योजना, मराठा मुस्लीम मतपेढ्यांमध्ये झालेला प्रचार, जातीय गणिते कोणाच्या बाजूने झुकतील? कोणत्या मतदारसंघात पक्षीय बलाबल कसं आहे? जाणून घेऊ..


छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षीय बलाबल कसे?


महाराष्ट्र विधानसभा २०१९च्या निवडणुकीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ. यातील सिल्लोड, औरंगाबाद मध्य, पश्चिम, पैठण आणि वैजापूर या पाच मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार. औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची आघाडी. आणि कन्नड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जागा आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाविरुध्द कोण राहणार?


औरंगाबाद पूर्व मतदारसंघ


औरंगाबाद पूर्व मतदारसंघात २०१९ च्या विधानसभेत भाजपच्या अतूल सावे यांनी एमआयएमच्या डॉ कादरी गफार यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे नेते व मंत्री अतुल सावे २०१९ मध्ये विजयी झाले होते. यावेळीही भाजपकडून अतुल सावेंना उमेदवारी आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर MIM कडून इम्तियाज जलील पूर्व विधानसभा मतदारसंघातून यंदा निवडणुकीत उभारले आहेत. तर काँग्रेसकडून लहु शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची निवडणुक चुरशीची होत असून निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.


औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ


औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट निवडणून आले होते. औरंगाबाद पश्चिममधून विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आले होते. ४० हजार मतांनी भाजपच्या राजू शिंदेंचा पराभव केला होता. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून राजू शिंदे विरुद्ध शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्यात लढत होत आहे. १९७२ मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघात काँग्रेसनं जागा जिंकत जवळपास १९८० पर्यंत या जागेवर काँग्रेसचं राज्य होतं. जनतेनं १९९९ नंतर कौल बदलत शिवसेनेला कौल दिला.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत येथील जनतेने आपला जनादेश बदलून शिवसेनेला ही जागा परत मिळवून दिली. तेव्हापासून २०१९ पर्यंत ही जागा शिवसेना जिंकत राहिली.


औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ


लोकसभा निवडणूकीनंतर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेना इच्छूकांची संख्या वाढली आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जैसवाल निवडून आले होते. २०२४च्या विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून  बाळासाहेब थोरात उभारले आहेत. तर शिंदे गटाकडून पुन्हा एकदा प्रदीप जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता २०१९ नंतर   ही निवडणूकही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच होणार असून मतदार प्रदीप जैसवालांना संधी देतात की बाळासाहेब थोरातांना हे स्पष्ट होईल.


पैठण विधानसभा मतदारसंघ


छत्रपती संभाजीनगरमध्ये २०१९ च्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भूमरे निवडून आले होते. लोकसभा निवडणूकीतही निवडून येत छत्रपती संभाजीनगरमधून भूमरेंना सहकारमंत्री झाले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तेंव्हाचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांनी निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दत्ता गोर्डे यांना पुन्हा संधी दिली असून शिंदे गटाकडून विलास भुमरे उमेदवार आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.


फुलंब्री विधानसभा मतदारसंघ


फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.फुलंब्री मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघाशी जोडलेला आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी पाच वेळेस प्रतिनिधीत्व केले आहे.कल्याण काळे फुलंब्री मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. यंदा काँग्रेसकडून विलास औताडे यांना संधी देण्यात आली असून भाजपकडून अनुराधा चव्हाणांना उमेदवारी देण्यात आली आहे. विलास औताडे हे काँग्रेसचे उमेदवार असून, त्यांचे वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत. 



कन्नड विधानसभा मतदारसंघ


छत्रपती संभाजीनगरचा कन्नड विधानसभा मतदारसंघ हा  अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा झेंडा या मतदारसंघावर असल्याने शिवसेना शिंदे गट विरुध्द शिवसेना उद्धव ठाकरे गट असाच सामना या मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना दिसणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून संजना जाधव उभ्या आहेत.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत कन्नड मतदारसंघातून एकमेव ठाकरे गटात राहिलेले आमदार उदयसिंह राजपूत यांचा विजय झाला होता. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव होते. त्यामुळे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकनिष्ठ असणारे आमदार आगामी विधानसभेत बाजी मारतात की शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा या मतदारसंघावर फडकतो? हे महत्वाचे ठरणार आहे.


सिल्लोड विधानसभा मतदारसंघ



फुलंब्री मतदारसंघाप्रमाणेच सिल्लोड मतदारसंघालाही महायुतीला आता नवा चेहरा द्यावा लागणार अशी अटकळ असताना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर  अब्दुल सत्तार यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने पुन्हा एकदा संधी दिली. तर महाविकास आघाडीतील सुरेश बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलग तीन वेळा या मतदासंघात अब्दुल सत्तार यांनी विजय मिळवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. तसेच मनोज जरांगे फॅक्टरमुळे ही लढत चुरशीची होत आहे.


गंगापूर विधानसभा मतदारसंघ


भाजपचे वर्चस्व असणाऱ्या गंगापूर मतदारसंघात यंदा भाजप विरुद्ध राष्ट्रवारी अशी लढत होणार आहे. २०१९ च्या विधानसभेत प्रशांत बंब यांचा विजय झाले होते.त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संतोष पाटील उभे होते. आता सध्याचे भाजप आमदार प्रशांत बंब  या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सतीश चव्हाणांनीही या मतदारसंघाकडे लक्ष वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे २००९ पासून प्रशांत बंब यांचे वर्चस्व असणाऱ्या गंगापूर मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे.


वैजापूर विधानसभा मतदारसंघ


मागील विधानसभेत वैजापूर मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रमेश बोरनारे  ९८ हजार १८३ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभय पाटील उभे होते. यापूर्वी २०१४ मध्ये भाऊसाहेब चिकटगावकरांचा विजय झाला होता. २०२४च्या विधानसभेत वैजापूर मतदारसंघात यंदा  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिनेश परदेशी विरुद्ध शिंदेसेनेचे रमेश बोरनारे अशी लढत होणार आहे.


हेही वाचा:


विधानसभेची खडाजंगी : 'पाटलां'च्या जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचं? सांगलीत जयंत पाटील-विश्वजीत कदमांना महायुती कशी भिडणार? आमदारांची यादी