ठाणे: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत, मला जास्त बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या असा सज्जड दम ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तुमच्यासारखा मी गद्दार नाही असा टोलाही विचारे यांनी शिंदेना लगावला. नरेश मस्के (Naresh Maske) हेच आनंद दिघे यांचे खरे चेले असल्याचं वक्तव्य केल्यानंतर राजन विचारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आपण आनंद दिघे यांच्यासोबत 40 वर्षे काम केलंय, त्यावेळी नरेश मस्के कुठे होता? असा सवाल त्यांनी केला. 


त्यावेळी नरेश मस्के कुठे होता? 


मी 40 वर्षे आनंद दिघेंसोबत होतो. त्यावेळी नरेश मस्के कुठे होते? शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ती आनंद दिघे यांनी वाढवली. आनंद दिघे हे मातोश्रीवर उमेदवारांची यादी पाठवायचे आणि नंतर ती फायनल व्हायची. 2014 साली एकनाथ शिंदे स्वतःच्या मुलाला घेऊन मातोश्रीवर गेले आणि तिकीट मागून घेतलं. आमच्यासोबतच्या शिवसैनिकांनी प्रचार करून त्यांना निवडून आणलं. 


महापालिकेत भ्रष्टाचार, यांना गोल्डन गँग म्हणायचे


माझ्याकडे पैसे नव्हते, मी सर्वसामान्य कर्तकर्ता म्हणून काम केलंय असं सांगत राजन विचारे म्हणाले की, आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या दुःखात मी सामील होतो. महापालिकेतील सभागृह नेतेपद मी यांच्यासाठी सोडलं. पण एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के यांनी महापालिकेची वाट लावली. महापालिकेत गोल्डन गँग कुणाला म्हणायचे हे सर्व लोकांना माहिती आहे. कोरोना काळात नरेश म्हस्के होते कुठे? ते त्यावेळी हात धुवून घेत होते.


नरेश मस्के हा अत्यंत खोटारडा माणूस


नरेश मस्के यांच्यावर टीका करताना राजन विचारे म्हणाले की, सत्तातर झाल्यानंतर पहिला पळणारा उंदीर म्हणेज नरेश म्हस्के. अंत्यत खोटारडा माणूस आहे हा नरेश म्हस्के. तो महापालिकेत काय करायचा हे सगळं माहिती आहे. मी जर काढायला गेलो ना तर पळता भुई थोडी होईल या म्हस्केची. त्यामुळे माझ्या नादी लागू नको.  


दुःखाच्या काळात शिंदेंसोबत होतो


एकेकाळी ठाणे हा आनंद दिघेंचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आज त्याची काय अवस्था झालीय, महापालिकेत यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी केला. हाच राजन विचारे एकनाथ शिंदे यांच्या दुःखाच्या काळात सोबत होता, शेवटच्या क्षणापर्यंत सोबत होता, यांच्यासारखी गद्दारी केली नाही असा टोलाही राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला


तुमचा आता कमी काळ राहिलाय, त्यात तुम्ही काम करा, मला जास्त तोंड उघडायला लावून नका असा इशाराही राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. हाच नरेश मस्के एकनाथ शिंदे यांना कंटाळून काँग्रेसमध्ये जात होता, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं म्हणून आपण त्यांना परत आणल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं.


एकनाथ शिंदे यांना माझ्यामुळे आमदारकी


एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा आमदारकी आपल्यामुळे मिळाल्याचा दावा राजन विचारे यांनी केला. ते म्हणाले की, बाळासाहेबांनी सतिश प्रधान यांचं नाव अंतिम केलं असताना त्यांना भेटून आपण एकनाथ शिंदे यांना आमदारकीचं तिकीट द्यावं अशी मागणी केली होती. नंतर त्यांना निवडून आणलं. 


आतापर्यंत जे काही झालं ते झालं, आमच्या नादी लागू नका, तुम्ही जे काय काम केलं त्याच्या आधारे लोकांकडून मतं मागा असं राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावलं. आम्ही शिंदेना कामं सुचवायचो, आयडीया द्यायचो, मग शिंदे तो कागद पुढे करून आपण काम केल्याचा आव आणायचे असा आरोप राजन विचारे यांनी केला. 


दिघे साहेबच्या ऑफिसला तुमचं नाव दिलं, लाज वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांनी त्यांच्या कार्यालयाला कधीही स्वतःच नाव दिलं नाही असं राजन विचारे म्हणाले. 


ही बातमी वाचा: