Sanjay Raut on Rajan Salvi: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत (Shivsena Uddhav Thackeray) समजले जाणारे शिवसैनिक राजन साळवी (Rajan Salvi) उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना आज साळवी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं . विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला मात्र निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही पक्षाच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांकडून दखल घेतली जात नसल्याने ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे . पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राजन साळवे यांच्यात संवाद सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले . राजन साळवी हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत . जिल्हाप्रमुख पदापासून उपनेते पदापर्यंत प्रतिष्ठित पदे त्यांना शिवसेनेने दिली . त्याबद्दल ते कायम कृतज्ञ असतात . बाळासाहेब ठाकरे यांचे ते शिवसैनिक आहेत .त्यांचं मनात असं काही असेल असं वाटत नाही असं संजय राऊत म्हणाले .


संजय राऊत काय म्हणाले ?


राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावलं आहे . विधानसभा निवडणुकीवेळी लांजा व राजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या, पण त्यांनी त्यांना नाकारल्या होत्या . राजन साळवी उद्धव ठाकरे यांना कधीही फोन करून बोलावू शकतात . त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत . राजन साळवी पक्षाशी कायम प्रामाणिक राहतील . पैसा आणि सत्तेच्या जोरावर सध्याचे राजकारणी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलवतायेत . ज्यांनी स्वतःला विकायला ठेवले आहे. त्यांचं सोडा पण निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुड झेप घेईल . पक्ष वाढवणे आणि सांभाळणे ही जबाबदारी आदित्य आणि उद्धव ठाकरे मेहनतीने करतात . काही जणांना रेडिमेट कार्यकर्ते मिळून पक्ष वाढवला जात असेल तर त्याला काही करू शकत नाही ,असं संजय राऊत म्हणाले . 


राजन साळवेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी  आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला. मात्र, निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही पक्षाच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्याकडून दखल घेतली जात नसल्यामुळे राजन साळवी (Rajan Salvi) हा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याशिवाय गेल्या दोन वर्षात राजन साळवी यांच्या मागे सातत्याने तपास यंत्रणांचा ससेमिरा असल्याचेही पाहायला मिळत होते. त्यामुळे राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये जाणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.