पुणे : राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पुण्यात (Pune) पावसामुळे पाणीबाणी अशी पूरस्थिती निर्माण झाली होती. खडकवासला धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडण्यात आल्याने ही परस्थिती उद्भवल्याचे सांगत महापालिकेतील एका अधिकाऱ्याचे निलंबनही करण्यात आलंय. मात्र, या परिस्थिती सर्वचजण जबाबदार आहेत. सध्या प्रशासनाकडे जबाबदारी असल्याने प्रशासनच जबाबदार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही टोला लगावला.  


पुण्यातील पूरस्थिती हाताळण्यावरुन राज ठाकरे यांनी महापालिका आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. पुण्यातील पूरस्थितीवरुन पुन्हा एकदा पुणे शहराचं विस्तारीकरण आणि नागरिकरणावर भाष्य केलंय. पुण्यात उद्भवलेल्या पूरस्थितीवर भाष्य करताना केवळ एका अधिकाऱ्याने निलंबन करुन हा प्रश्न सुटणार नसल्याचेही राज यांनी म्हटले. 


राज्य सरकारलां, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना स्वतः लक्ष घालावं लागणार आहे. माजी नगरसेवकांनी नीट जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. कोणताही प्रकल्प आणताना सर्वांना विचारात का घेतल्या जात नाही. लोकांशी , पत्रकांरांशी का बोलत नाहीत. आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. कोण्या एकट्या पक्षाच हे काम नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले. तसेच, पुण्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना अजित पवारांना टोलाही लगावला. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी नाव न घेता अजित पवारांना लगावला आहे. 


शरद पवारांवरही टीका


पुण्यात पोर्शे कार अपघात झाला, त्यामध्ये दोन मुलं गेली पण त्यांच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही. बातम्या फक्त त्यांच्याच येतात, दोन मुलांच्या येत नाहीत, असेही राज यांनी म्हटले. तसेच, शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं विधान केल्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर,  त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं नाही, पण पवार साहेबांनी याला हातभार लावू नये, अशी टीकाही राज यांनी केली. 


हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही


महाराष्ट्रात जे काही आता चालू आहे ये आता दुर्दैवाची गोष्ट आहे. फक्त मतांसाठी मनं दूषित केली जात आहेत, हे चांगलं लक्षण नाही. राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे. तुमच्यातले मतभेद बाजूला ठेवून, जातीपातीतलं विष कालवून जर मत मिळणार असेल तर महाराष्ट्राचे भविष्य काही चांगलं नाही, असेही राज यांनी सध्या आरक्षणाच्या मुद्दयावरुन सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षावर भाष्य करताना म्हटले. 


सरकारकडे टाऊन प्लॅनिंग नाही


नदीत अनधिकृत बांधकाम झाल्यामुळेच पूरस्थितीची घटना घडली. सरकारने मदत करणे गरजेचे आहे, वाऱ्यावर सोडून चालणार नाही. सरकारकडे टाऊन प्लॅनिंग काही नाही, 
अचानक जास्त पाणी सोडल्याने ही घटना घडली, घरात पाणी शिरले. कोणत्याही शहरात टाऊन प्लॅनिंग चालवलं जातं नाही. दिसली जमीन की विक, असंच चालू आहे. नेक्सस चालू आहे. एक पुणे नाही तर पुण्यात पाच पाच शहर झाली आहेत, असे म्हण राज ठाकरेंनी पुण्याच्या विस्तारीकरणावर भाष्य केलंय. 


निवडणुका नाहीत, नगरसेवकच नाहीत


कमी काळात विस्तार झालाय, विचित्र आहे अद्भुत आहे. केंद्र सरकार, राज्यातील निवडणुका घेत नाही. नगरसेवक नाही, त्यामुळे जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल राज यांनी विचारला आहे. तसेच, ही सगळी जबाबदारी प्रशासनाची असल्याचंही ते म्हणाले. बाहेरुन येणाऱ्यांना फुकट घर दिली जात आहेत,आणि इथल्या लोकांना बेघर केलं जातं आहे. याला सरकार चालवणे म्हणतात का?, असा सवाल राज यांनी विचारला. आपल्या राज्याचा कुठं विचार केला जाणार आहे का नाही. या विषयी बैठक होईल मुंबईला, मग तुमच्याशी परत बोलेन. पण, पुणे सारख्या शहरात साफसफाईला पनवेल आणि ठाण्यामधून लोक मागवावे लागतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अधिकाऱ्यांच निलंबन होऊन काही होणार नाही,प्रश्न सुटणार नाही.