जळगाव : महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. आम्ही सन्मानजनक जागा लढणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. अजित पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून यावर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) जागावाटपावरुन महायुतीत (Mahayuti Seat Sharing) जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. जागा वाटपात महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.  


'तो' निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल


अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर दादा भुसे म्हणाले की, याच्यात गैर काय आहे. विधानसभेच्या जागा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित बसून निर्णय करतील. तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल आणि त्या निर्णयानुसार आम्ही पुढे मार्गक्रमण करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दादा भुसेंची प्रतिक्रिया


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दादा भुसे म्हणाले की, मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा विधानसभा तसेच विधान परिषदेमध्ये झालेला आहे. अनेकांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं, मात्र त्याला स्थगिती देण्यात आलेली नाही. जो निर्णय झाला त्यानुसार मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ सुद्धा मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाखोंच्या संख्येने यंत्रणा कामाला लावून मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल तयार केलेला आहे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला आहे त्यावर ते ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलेला आहे. तो पाळण्यासाठी त्या पद्धतीने मार्गक्रमण सुरू असून काम प्रगतीपथावर आहे. ओबीसीमध्ये सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, या संदर्भात सह्याद्रीवर बैठक झाली. मात्र, या बैठकीला महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते हजर राहिले नाही, असे त्यांनी म्हटले. 


रक्षाबंधन, भाऊबीजची भेट मुख्यमंत्री देतील


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सरकारवर सडकून टीका करत आहे. यावर दादा भुसे यांनी विचारले असता ते म्हणाले की, हे लोक आधी बोलायचे हे असंविधानिक तसेच घटनाबाह्य सरकार आहे. आता तेच लाडकी बहीण योजना आली तर पंधराशे नाही तर दहा हजार रुपये दिले पाहिजे असे म्हणतात. पंधराशे रुपये कुठून देणार? असा प्रश्न उपस्थित करतात. हेच महाभाग दहा हजार रुपये दिले पाहिजे, अशी मागणी करतात. लोकांमध्ये अफवा आणि संभ्रम निर्माण करण्यामध्ये लोकसभेला ते यशस्वी झाले. मात्र आता शविधानसभा निवडणुकीत ते यस्वी होणार नाहीत. जनता सुद्धा त्यांना थारा देत नाही. माझ्या लाडक्या बहिणींना पण माहिती आहे की काय शक्य आहे आणि काय अशक्य आहेत. लाडक्या बहीण योजनेसाठी संपूर्ण पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे. रक्षाबंधन, भाऊबीजची भेट मुख्यमंत्री देतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 


आणखी वाचा


महायुतीच्या जागावाटपाचं ठरलं? 288 ची तजवीज, पण निवडणूक महायुतीतच; नेमकं चाललंय काय?