Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्याविरोधात 5 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray) हे एकत्र येणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (27 जून) ही घोषणा केली. तसेच मला काल (26 जून) राज ठाकरेंचा फोन आला होता, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. आज माध्यमांशी बोलताना काल नेमकं काय काय घडलं?, याबाबत सर्व माहिती संजय राऊतांनी दिली.
राज ठाकरे यांनी मला फोन केला. मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणे योग्य नाही. एकच मोर्चा निघायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. याबाबत उद्धव ठाकरेंना मी बोललो की, मला राज ठाकरेंचा फोन आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा आढेवेढे न घेता तयार झाले. मराठी ऐक्य दिसले पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 6 तारखेला मनसे पुरस्कृत मोर्चा होता. मी परत राज ठाकरे यांना फोन करून सांगितलं की, आषाढी एकदशी आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी 5 जुलै ही तारीख ठरवल्याचं संजय राऊतांनी सांगितले.
...अन् ठाकरे बंधू एकत्र येण्याचं ठरलं, नेमकं काय घडलं?
मला राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. मराठी माणसाचे दोन मोर्चे निघणे बरे दिसत नाही. एकत्र आंदोलन झाले तर प्रभाव पडेल. अशी भूमिका त्यांनी मांडली. मी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे जे काही बोलले ते सांगितले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले मराठीचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे. त्यानंतर दोघांनाही एकत्र मोर्चा काढण्याचं ठरवलं. दोघांचा मोर्चा 5 तारखेला निघेल.सकाळी 10 ची वेळ योग्य नाही आम्ही याबाबत चर्चा करू...वेळेच्या बाबतीत काही चर्चा करू, असं आम्ही ठरवलं आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य काय म्हणाले?
ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, आनंदाची गोष्ट आहे, मी तेच सांगितलं की कालाय तस्मै नम: आता जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा हे जुळून आलं आहे. मराठीसाठी हे दोघे एकत्र येणे आनंदाची गोष्ट आहे. माझ्या दोघांना शुभेच्छा आहेत. मराठी माणसाचं हित या दोघांच्या माध्यमातून व्हावं, अशी मी प्रार्थना करतो. शेवटी दोन्ही भाचे असल्याने आनंद आहे मामा म्हणून आनंद आहे. मी राजकारणात पडत नाही, पण दोघे एकत्र आले तर माझा त्याला पाठिंबा आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.