Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून निघणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार असणार आहे. याचदरम्यान, आज शिवसेनेचे मुखपृष्ठ सामनाच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी छापण्यात आली आहे. या बातमीच्या मथळ्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'राज ठाकरे यांनी दादांचा भुसा केला', असं या बातमीसाठी मथळा देण्यात आला आहे.
सामानाच्या पहिल्याच पानावर आज उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून "राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला" अशी बातमी सामनाने आज छापली आहे. सामनाच्या पहिल्याच पानावर ठाकरे बंधूंचा आजूबाजूला फोटो छापून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधी आंदोलनाची बातमी देण्यात आली आहे. हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी बाजूला राज ठाकरेंची भूमिकेची बातमी सामनाने आज छापली आहे.
सामनामधील बातमीत नेमकं काय म्हटलंय?
हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला आझाद मैदानावर जाणारा मोर्चा मराठी माणसाचा असेल. मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा भुसा केला. हिंदी सक्तीचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी घरी आलेल्या भुसे यांची राज यांनी हजेरी घेतली. भुसे यांच्या प्रेझेंटेशनने राज यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ते फेटाळून लावत राज यांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केली. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघेल. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. हा मोर्चा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच मोर्चाचा अजेंडा असेल. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल, असे राज यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत मोर्चाची 6 जुलै ही तारीख त्यांनी सांगितली. मात्र नंतर एक्स पोस्टच्या माध्यमातून 6 ऐवजी 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघेल, असे त्यांनी जाहीर केले.
...तरी भुसे शिक्षण मंत्री झाले ना?
आजवर महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीनुसार आपल्याला पाचवीनंतर हिंदी भाषेचा पर्याय होता. त्याच शिक्षण पद्धतीत शिकून आपण मोठे झालो आहोत. असे असताना अचानक ही तिसरी भाषा का लादताय? पाचवीनंतर हिंदी भाषेचा पर्याय घेऊन तेच शिक्षण घेऊन दादा भुसे आज शिक्षण मंत्री झाले ना? त्यांना कोणी पहिलीपासून हिंदी शिकवलेली का, असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला.