Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या एल्गाराची घोषणा केली होती. हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकत्रित एकच मोर्चा काढावा, यासाठी प्रयत्न सुरु होते. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही एक मो यासाठी हालचाली सुरु होत्या. यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रतील शाळात हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?

मला तर वाटतं, मराठी माणसाची एकत्र ताकद दिसणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी काल आवाहन केलं होतं, त्याला समोरुन प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेची गळचेपी आणि हिंदी भाषेचीसक्ती लादण्याचा प्रयत्न होतोय, त्याविरोधात मराठी माणसाने एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही. मराठी भाषेपुढे कोणीही छोटं-मोठं नाही, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी राज ठाकरे सकारात्मक आहेत, आम्ही सगळे सकारात्मक आहोत. 5 जुलै रोजी हा मोर्चा एकत्रितपणे निघेल, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?

ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मराठी माणसासाठी मी माझा व्यक्तिगत अहंकार बाजूला ठेवू शकतो, ते महाराष्ट्रापेक्षा मोठं नाही, असं राज ठाकरेंनी विधान केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तेव्हा लगेच राज ठाकरेंना प्रतिटाळी दिली होती. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र यांचं हित पाहणाऱ्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे आणि अहित करणाऱ्या लोकांना सोडून उभं राहिले पाहिजे. महाराष्ट्राचं अहित करणाऱ्यांनी विडा उचलला होता, त्यांनी बरेच प्रयत्न केले हा मोर्चा निघू नये, असं अरविंद सावंत म्हणाले.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार काय म्हणाले?

मराठीसाठी दोन्ही भाऊ येऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

भाजपाचे आमदार प्रसाद लाड काय म्हणाले?

मराठी भाषेला आम्ही बोट देखील लावायला देणार नाही. हा आमच्या महायुती सरकारचा शब्द आहे. त्यामुळे ठाकरे ज्या पद्धतीच्या बाता मारत आहेत, या भुलथापा आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून त्यांना फसवण्याचे काम करत आहेत. मराठी माणसाच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार खंबीरपणे उभे आहे, असे भाजपाचे आमदार प्रसाद लाड म्हणाले.

नेमकं काय म्हणाले चंदूमामा वैद्य?

ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, आनंदाची गोष्ट आहे, मी तेच सांगितलं की कालाय तस्मै नम: आता जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा हे जुळून आलं आहे. मराठीसाठी हे दोघे एकत्र येणे आनंदाची गोष्ट आहे. माझ्या दोघांना शुभेच्छा आहेत. मराठी माणसाचं हित या दोघांच्या माध्यमातून व्हावं, अशी मी प्रार्थना करतो. शेवटी दोन्ही भाचे असल्याने आनंद आहे मामा म्हणून आनंद आहे. मी राजकारणात पडत नाही, पण दोघे एकत्र आले तर माझा त्याला पाठिंबा आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

प्रकाश महाजन काय म्हणाले? 

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले आहेत की, "मला अत्यंत आनंद झालाय. मी बातमी ऐकली, संजय राऊतांनी ट्वीटही केलाय. राज ठाकरेंनी सर्व मराठी माणसांना आवाहन केलेल की, मराठीसाठी तुम्ही एकत्र या... त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. मला याचा आनंद आहे. पुढे काय होईल, काय नाही... भविष्य मी आज वर्तमानात सांगू शकत नाही... पण एक सुरुवात चांगली झाली. ज्या गोष्टीचं आम्ही स्वप्न पाहत होतो, ते स्वप्न पाहायला सुरुवात झाली, ज्या रस्त्यावर एकत्र चालावं असं वाटतं होतं, त्यावर पहिलं पाऊल पडलंय... मराठी माणसासाठी खूप महत्त्वाचंय... मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी हे खूप हिताचं आहे... प्रश्न भाषेचाच नाहीतर अजून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही एकत्र लढा दिला तर निश्चित मराठी माणसाचं भलं होईल.", असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.  

सामनाच्या फ्रंट पेजवर राज ठाकरे-

सामानाच्या पहिल्याच पानावर आज  उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून "राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला" अशी बातमी सामनाने आज छापली आहे. सामनाच्या पहिल्याच पानावर ठाकरे बंधूंचा आजूबाजूला फोटो छापून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधी आंदोलनाची बातमी देण्यात आली आहे. हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी बाजूला राज ठाकरेंची भूमिकेची बातमी सामनाने आज छापली आहे.

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला'; शिवसेनेच्या मुखपृष्ठ सामनाच्या फ्रंट पेजवर बातमी, अन् बाजूला...