Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: त्रिभाषा सूत्र विरोधात ठाकरे बंधू सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत. हिंदीच्या मुद्द्यावरुन 5 जुलैला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, असा हा विराट मोर्चा असेल.

हिंदीच्या मुद्द्यावरुन 5 जूलैच्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल. मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच मोर्चात सर्वपक्षीयांसह सर्व साहित्यिक, कलाकार, तज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील सहभागी व्हावं, असं आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक मराठी कलाकार, साहित्यिक, शाळेतील शिक्षक, राजकीय नेते या मोर्चात सहभागी होतील. तसेच मनसेकडून आता या मोर्चात सहभागी होण्यासाठी विविध मंडळांना देखील आवाहन केले जाणार आहे. 

मनसेकडून विविध मंडळांना केले जाणार आवाहन-

हिंदीच्या मुद्द्यावरुन पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून विविध मंडळांना केले जाणार आवाहन करण्यात येणार आहे. मुंबईतील दहीहंडी पथक, गणेश मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ अशा विविध मंडळांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. आज संध्याकाळी विभाग रचनेनुसार विविध मंडळांसोबत मनसेकडून मुंबईत बैठका घेतल्या जाणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात देखील वरळी येथे मंडळांसोबत एक बैठक पार पडणार आहे.  

दोन्ही पक्षाकडून नियोजनाची तयारी सुरु-

5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनाची तयारी दोन्ही पक्षाकडून सुरु करण्यात आली आहे. काल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती. त्यानंतर संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरेंची देखील मुंबईतील एका कार्यक्रमात भेट झाली. हिंदीच्या मुद्द्यावरुन या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला आहे.

ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल?

दिनांक- 5 जुलै 2025

ठिकाण- दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान 

वेळ- मोर्चाची वेळ येत्या काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता.

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray Morcha: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा कुठून कुठपर्यंत?; दिनांक, ठिकाण अन् वेळ; ठाकरे बंधूंच्या मोर्चाची A टू Z माहिती

Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरेंचा फोन आला होता, हे मी उद्धव ठाकरेंना बोलताच, त्यांनी आढेवेढे...; संजय राऊत काय म्हणाले?