नांदेड :  राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होऊन पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीची पूजा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील तशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन झाल्यास अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. 

प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणाले?

मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्यासाठी 19 वर्षांपासून वारीत जात असतो. त्यापद्धतीनं पांडुरंगाच्या चरणी लीन  झालो. पांडुरंगाकडे प्रार्थना केली की या राज्यातला शेतकरी कष्टकरी सुखी समृद्ध व्हावा. नांदेड आणि काही भागावर दुबार पेरणीचं संकट येणार होतं ते टळावं आणि ते टळलं. याबाबत पांडुरंगाकडे प्रार्थना केली. त्याचवेळी मला प्रश्न विचारण्यात आला की अमोल मिटकरी म्हणाले की अजित पवार पुढच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून पुजेला यावेत असं म्हटलं त्यावर तुमचं काय मत आहे? मी निश्चितपणे सांगेन की देवेंद्र जी फडणवीस भक्कम पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत. महायुतीत अजित पवार आणि फडणवीस यांचं सख्य आहे.  महायुतीत एवढा भक्कम पाठिंबा असताना आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचा नेता मोठा व्हावा हे सगळ्यांना वाटतं तसं मला देखील वाटतं, असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.  

देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठं पद मिळालं तर निश्चित दादाच मुख्यमंत्री होतील. दादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली, असं प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले. जे सत्य आहे, मला जे वाटतं, माझं वैयक्तिक मत मांडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन झालं तर राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत, ही माझी भावना आहे ती पांडुरंगाकडे  ठेवली आहे, असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. 

अमोल मिटकरी काय म्हणाले होते? 

आम्ही पांडुरंगाला एकच साकडे घातले की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण, पुढील आषाढी एकादशीला शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, असे अमोल मिटकरी म्हणाले होते. यानंतर राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी देखील अशीच इच्छा बोलून दाखवली होती.“इच्छा असण्यात वाईट काय? मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं आहे?”,असं  माणिकराव कोकाटे म्हणाले होते.