Raj Thackeray On MNS Deepotsav Celebration Shivaji Park: यंदा आम्ही दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले , मला अजिबात पटत नाही!
Raj Thackeray On MNS Deepotsav Celebration Shivaji Park: मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करत दीपोत्सव साजरा केला जातो.

Raj Thackeray On MNS Deepotsav Celebration Shivaji Park: राज्यातील 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अंदाजे 141.53 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये जिरायती, बागायती आणि फळबागांचा समावेश आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दरवर्षी मुंबईतील छत्रपती महाराज शिवाजी पार्क मैदानात साजरा होणारा दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करत दीपोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं राज ठाकरेंनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत जाहीर केले.
राज ठाकरे काय म्हणाले? (Raj Thackeray On MNS Deepotsav Celebration)
प्रचंड उत्साह असतो. इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये रोषणाई केलेली असते, फटाक्यांची आतषबाजी असते. ती आतषबाजी पाहण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या आहेतच, मुंबई, ठाणे, इतर सर्व ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोकं तो दीपोत्सव पाहण्यासाठी म्हणून आवर्जून इथे येतात आणि त्याचा आनंद लुटतात.सगळेजण खूप इथे मजा करत असतात. परंतु या वर्षीचा दीपोत्सव हा साजरा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेला, आलेला आणि येऊ घातलेला हा जो भयानक दुष्काळ आहे, या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचा उत्सव साजरा व्हावा, असं मनाला काही पटलं नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले.
आज महाराष्ट्र अत्यंत एका विचित्र अवस्थेमधून जातो आहे. महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आज पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, दुष्काळ तर भयानक आहे आणि येणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ज्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करतोय ते पाहणं हे आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या आपले बांधव-भगिनी, या भगिनींना काय वाटत असेल, त्यांच्या कच्च्या-बच्च्यांना काय वाटत असेल, मला असं वाटतं या गोष्टींचा आपणच विचार केला पाहिजे. आणि हा सारासार विचार करता, कारण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1972 पेक्षाही जास्त भयानक हा मोठा दुष्काळ असेल आणि हे त्यांनी अगोदर जाहीर करून देखील मला असं वाटतं सत्ताधारी पक्षातल्या लोकांना बहुदा ते समजलं नाही आणि ते गरबा खेळत बसले. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु इथे दिवाळी हा सण साजरा करत असताना, अशा प्रकारचा दीपोत्सव साजरा करत असताना मनाला ते काही पटत नाही आणि म्हणून या वर्षी हा निर्णय घेतला की हा दीपोत्सव साजरा करायचा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
नम्र आवाहन. https://t.co/KDkGAVF0ZC
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2026
रोषणाई करणं, फटाके फोडणं या गोष्टींना आवर घालावा- राज ठाकरे (Raj Thackeray On MNS Deepotsav Celebration)
पुढल्या वर्षी सगळं ठीकठाक होईल, व्यवस्थित होईल अशी आशा-अपेक्षा आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना देखील आहे की सगळं नीट होऊ दे. आज महाराष्ट्रामधून असंख्य ठिकाणांवरून तांड्याच्या तांडे बाहेर पडतील आणि ते शहरांकडे येतील. शहराची परिस्थिती आता आपण बघतोच आहोत. आणि अशा सगळ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा उत्सव साजरा करणं हे मला पटलं नाही, माझी आपल्याला देखील नम्र विनंती आहे. काही आपल्याला काळी दिवाळी साजरी नाही करायची आहे, परंतु त्या उत्साहाला कुठेतरी आपण आवर घालणं आवश्यक आहे. फटाके फोडताना, रोषणाई करताना कुठेतरी आपण आवर घालणं, स्वतःलाच आवर आवश्यक आहे. आपण सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहोत, महाराष्ट्रावरती आपलं प्रचंड प्रेम आहे, सर्वांचंच प्रेम आहे. आणि महाराष्ट्रामधला नागरिक अशा प्रकारे होरपळत असताना आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरा करायचा हे काही मला पटत नाही, आपल्यालाही नाही पटलं पाहिजे. आणि म्हणून आपण या दिवाळीला आपण सर्वांनीच, अर्थात कंदील लावावेत, फराळ वाटावा, सगळ्या गोष्टी कराव्यात, परंतु रोषणाई करणं, फटाके फोडणं या गोष्टींना आवर घालावा एवढीच फक्त मला आपल्याला विनंती करायची आहे. पुढल्या वर्षी पुन्हा एकदा आपण जोरात ही दिवाळी, दीपोत्सव आपण साजरा करूया. तोपर्यंत एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आजचा हा आपल्यासमोर मी आलो.परंतु येणाऱ्या या दिवाळी सणाला आपण सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा, असं राज ठाकरे म्हणाले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
Before You Go
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी






















