Raj Thackeray: मनसेकडून ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव नाही, राज ठाकरेंची एबीपी माझाला माहिती
Maharashtra Political Crisis गेल्या आठवड्यात मनसेची बैठक झाली आणि त्यात काही नेत्यांनी ठाकरेंना साथ द्यावी, असा सूर लावला.
मुंबई : शिवसेनेतून शिंदे गट भाजपसोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. आता राष्ट्रवादीतील एक गटही सरकारमध्ये सामिल झाला, त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एकत्र यावे, अशी भूमिका महाराष्ट्र सैनिक मांडत आहेत. त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र येणार का? आशयाचे बॅनर्सही झळकले होते. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरेना दोन वेळा एकत्र येण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, या चर्चांना उधाण आले होते. मात्र राज ठाकरेंनी प्रस्तावाच्या चर्चांचे खंडन केले आहे. मनसेकडून ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही, अशी माहिती राज ठाकरेंनी एबीपी माझाला माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेत थेट आठ आमदारांसह शपथ घेतली. अजित पवार यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला आहे. या सर्वांची मुळे 2019 च्या निवडणुकीच्या निकालात दडलेली आहेत. भाजप-शिवसेनेनं युती करून निवडणूक लढवली आणि प्रत्यक्षात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र आले. भाजप आणि अजित पवारासंह राष्ट्रवादीतील एक गट एकत्र आले आणि फडणवीस-अजितदादा यांनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर राजकारण असं काही फिरलं की फडणवीस-अजितदादांचं सरकार जेमतेम 72 तास तग धरू शकलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं.
2019 मध्ये महाराष्ट्रातील राजकारणाने वेगळंच वळण घेतलं. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले. तर राष्ट्रवादीची अलर्जी असलेल्या भाजपनेही 72 तासांसाठी सरकार स्थापन केलं. हे दोन धक्के महाराष्ट्राने पचवले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून शिवसेनेला धक्क दिला आणि अवघे 40 आमदार सोबत असताना आमदार असलेल्या भाजपच्या उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. हे राजकारणही महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्यानंतर सत्तासंघर्षाचं एक वर्षही पाहिलं. याच राजकारणाने त्यानंतर पुढचं पाऊल टाकलं आणि चक्क अजित पवारांनी बंडाचा झेंडा हाती घेत थेट सत्तेत प्रवेश मिळवला.
सध्याचे राजकारण पाहून शिवसैनिकांच्या आशा प्रफुल्लीत झाल्या नाही तरच नवल. गेल्या आठवड्यात मनसेची बैठक झाली आणि त्यात काही नेत्यांनी ठाकरेंना साथ द्यावी, असा सूर लावला. यावर राज ठाकरे काही बोलले नाहीत. पण हा सूर खूप परिणाम करून गेला. प्रथम सेना भवनबाहेर एक बॅनर लागला, साहेब, आता तरी एकत्र या! या बॅनरवर फोटो होते ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि मध्यभागी बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रातील राजकारण एवढं बदललंय की कधीही काहीही होऊ शकतं. मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर...झालं लगेच ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आदी शहरांत होर्डिंग्ज लागले, ठाकरे बंधूंना एकीचं आवाहन होऊ लागलं.आता हे कमी म्हणून की काय, आज संजय राऊत आणि मनसेचे अभिजीत पानसे यांनी एका गाडीतून प्रवास केला. त्यानंतर राऊत मातोश्रीवर गेले आणि पानसे शिवतीर्थवर गेले आणि पुन्हा चर्चेला उधाण आलं.