Raj Thackeray Melava :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्यातील मेळाव्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. त्याचप्रमाणे यावेळी राज ठाकरे यांच्या लूकनेही साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर मरुन रंगाची शॉल असा पेहराव यावेळी राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी व्यासपीठावर येताच शिवर्तीर्थावर जमलेल्या लोकांना नमस्कार केला. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होती. दरम्यान या मेळाव्याचा मनसेकडून जो टीझर प्रदर्शित करण्यात आला होता, त्यामुळे राजकीय रिंगणात आता कोणती समिकरणं पाहायला मिळणार याची उत्सुकता सध्या सगळ्यांना लागून राहिली होती. राज ठाकरे काय संवाद साधणार, महायुतीत समील होण्याची घोषणा करणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. 


राज ठाकरेंच्या लूकनं वेधलं लक्ष


शिवाजी पार्कचं मैदान हे ठाकरेंच्या आवाजाने कायमच गाजलं आहे. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांची भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्यने जनसमुदाय हा शिवतीर्थावर येत असतो. त्यातच राज ठाकरे यांच्या भाषणाची शैली ही बाळासाहेब ठाकरेंसारखीच असते, अशीही अनेकांची धारणा आहे. त्यामुळे त्यांच्या लूकनं विशेष लक्ष वेधललं असतं. बाळासाहेबांची शैली असलेला लूकच यावेळी राज ठाकरेंनी केला होता. बाळासाहेब ठाकरे देखील दसऱ्या मेळाव्यातील त्यांच्या भाषणासाठी असाच काहीसा लूक करायचे. मागील काही गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचा तसाच काहीसा लूक पाहायला मिळतोय. 


राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील पुढचा टप्पा काय ?


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. मध्यंतरी ते महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्याकरता त्यांनी भाजपा नेते अमित शाह यांचीही भेट घेतली होती. परंतु, या भेटीत काय चर्चा झाली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या सर्व बाबींवर मेळाव्यातून राज ठाकरे संवाद साधण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात होतं.  राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील पुढचा टप्पा काय, ते कोणाला साथ देणार, त्यांची रणनीती काय याची देखील बरीच उत्सुकता लागून राहिली होती.