बारामती: विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फलटणमधील अनंत मंगल कार्यालयात धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी रामराजे यांना या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Loksabha) धैर्यशील मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.
महायुतीने रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून तिकीट दिले आहे. परंतु त्याला धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्याकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यातच मंगळवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी फलटणमध्ये येऊन रामराजे यांना शुभेच्छा दिल्याने माढ्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
धैर्यशील मोहिते पाटील पवारांना भेटले, माढा उमेदवारीवर अभयसिंह जगताप, प्रवीण गायकवाड काय म्हणाले?
धैर्यशील पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार?
गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मध्यंतरी अमवस्या असल्यामुळे धैर्यशील पाटील यांनी निर्णयाची घोषणा केली नाही, असे सांगितले जात होते. मात्र, ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शरद पवार गटात जाणार का, अशी चर्चा होती. मात्र, हा मुहूर्त संपत आला तरी धैर्यशील पाटील यांचा पक्षप्रवेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे महादेव जानकर यांच्याप्रमाणे धैर्यशील पाटीलही शरद पवारांना हुलकावणी देणार का, असाही अंदाज वर्तविला जात आहे.
गेल्या आठवड्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली,याचा तपशील समोर आला नव्हता. मात्र, या सव्वा तासाच्या बैठकीत धैर्यशील पाटील यांनी काही अडचणीचे मुद्दे शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते. या सगळ्या समस्यांचे निराकरण झाल्यानंतर धैर्यशील मोहिते हे शरद पवार गटात प्रवेश करु शकतात. मात्र, तुर्तास तशी कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे आता माढ्यात काय घडणार, शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा