Uddhav Thackeray On Raj Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील बीकेसीत भव्य सभा घेत आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला आहे. अभिनेता संजय दत्त याच्या मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले आहेत की, ''मुन्नाभाई चित्रपटात त्याला गांधीजी दिसतात, तसं एकाला बाळासाहेब दिसतात, नाव न घेता त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अशी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे, आपल्याकडे. स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात. शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय, असे मुन्नाभाई फिरताहेत.'' आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, ''आता आदित्य तिरुपतीला गेला होता, आता अयोध्येला जाईल. रामजन्मभूमीला मी जाताना शिवनेरीची पवित्र माती नेली. तेव्हा चमत्कार योगायोग म्हणा आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, त्याचे भांडवल आम्ही केले नाही.''
मनसेचं मुख्यमंत्र्यांना 'गेट वेल सून'
उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमली. मात्र त्यात तो उत्साह नव्हता. आम्हाला आजच्या सभेकडून अपेक्षा होती की, बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होत, माझं सरकार आलं. तर मशिदींवरील भोंगे बंद होतील आणि रस्त्यावरील नमाजही बंद होईल. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी किमान पातळीवर घोषणा करावी की. होय आम्ही हे करणार. मात्र आता भगवा मास्क निघाला हिरवा मास्क चढला आहे.'' ते म्हणाले, ''मुन्नाभाईमधला एक संवाद आज उद्धव ठाकरे म्हणाले, मात्र या चित्रपटाच्या दोन्ही भागात तो काम करताना दिसतो. यातच तो काम करत असताना पहिल्या भागात त्याला डॉ.अस्ताना हा अडचणी निर्माण करतो. तर दुसऱ्या भागात लकी सिंह हे काम करतो. आज या दोघांसारखंच काम मुख्यमंत्री करत आहेत. त्यांना आमचं इतकंच म्हणणं आहे की, गेट वेल सून.''
संबंधित बातमी:
भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
Uddhav Thackeray speech : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे