मुंबई: हिंदुत्वासाठी महायुतीसोबत एकत्र आलो तर वाईट वाटायचं कारण नाही, राज ठाकरे जी काही भूमिकी घेतील ती देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने महत्वाची असेल असं वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केलंय. महायुतीत गेलो तर त्याचा फायदाच होईल असंही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या आधी बाळा नांदगावकरांनी (Raj Thackeray) हे वक्तव्य केल्यामुळे त्याची राजकीय चर्चा रंगली आहे. 


हिंदुत्वासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो तर त्याचा फायदा होणार आहे, या आधीही शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत होतो, त्यामुळे आता जरी एकत्र आलो तर त्यात काही नवीन नसणार असं बाळा नांदगावकर म्हणाले.


राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबईतलं शिवाजी पार्क मैदान सज्ज झालंय. मनसेच्या या पारंपरिक मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार, याविषयी केवळ मनसैनिकच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या मनात प्रश्न आहे. याचं कारण आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल? या प्रश्नांची उत्तरं याच गुढीपाडवा मेळाव्यात मिळणार आहेत. 


यंदा राज ठाकरेंचा पक्ष निवडणूक लढवणार? 


या आधी 2014 आणि 2019 साली मनसेने लोकसभेची निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली होती. पण यंदाची परिस्थिती वेगळी असल्याचं दिसतंय. यावेळ राज ठाकरेंनी आधीपासूनच भाजपला पुरक अशी भूमिका घेतल्याचं दिसतंय. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे भाजपनेही त्यांच्यासोबत बोलणी सुरू केल्याचं दिसतंय.


मनसे-भाजप युतीची चर्चा


महायुतीत राज ठाकरे यांचा सहभाग व्हावा असं भाजपला वाटतंय. त्याचमुळे राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीमध्ये एक बैठकही झाली. त्या बैठकीत दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडण्यात येईल अशी चर्चा होती. तसेच शिर्डीच्या जागेचाही विचार होत असून त्या ठिकाणाहून मनसेच्या बाळा नांदगावकरांचं नाव चर्चेत होतं. पण दक्षिण मुंबईची जागा राज ठाकरेंच्या उमेदवाराने कमळ या चिन्हावर लढवावी अशी भूमिका भाजपमधील एका गटाने घेतल्याची माहिती समोर आली होती.


कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतल्याने मधल्या काळात मनसे आणि भाजपची चर्चा थांबल्याचं दिसलं. त्यात महायुतीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. 


भाजपने जाहीर केलेल्या जागांपैकी दक्षिण मुंबई आणि शिर्डी या ठिकाणचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे मनसे अद्यापही महायुतीत सामील होऊ शकते अशी चर्चा आहे.


ही बातमी वाचा :