मुंबई : प्रभागरचना करण्याचे आदेश आल्यानंतर महानगरपालिका (BMC Election 2025) निवडणुकांसाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र यावेत (Raj Thackeray - Uddhav Thackeray) यासाठी दोन्ही सेनेचे कार्यकर्ते उत्साही आहेत. दोन्ही ठाकरेंकडून तशा हालचाली सुरु असल्याची चर्चा होती. मात्र आज या सर्व घडामोडी उधळून लावणारी घटना समोर आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी राज ठाकरेंचं निवासस्थान किंवा मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान याठिकाणी या चर्चा होत असत. पण आजच्या चर्चेचं ठिकाण हे वांद्रे येथील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. त्यामुळे आता राज ठाकरे नेमकी युती कुणासोबत करणार, देवासोबत की भावासोबत असा प्रश्न आहे.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदल्या दिवशी म्हणजे कालच जाहीर केलं होतं. मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम नियोजित असतात, त्यामुळे दौऱ्यांचं वेळापत्रक आधीच जाहीर होतं. पण आजच्या वेळापत्रकामध्ये राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीचा कुठेही उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या शेड्युलमध्ये नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट ही अनपेक्षित आणि गुप्त होती.
राज ठाकरे हे आज सकाळी 9.40 वा वांद्र्यातील ताज लँडस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा 10.35 वा. ताजमध्ये दाखल झाला. दोघांमध्ये तासभर चर्चा झाल. दोन नेत्यांमध्येच चर्चा झाल्यानंतर सकाळी 11.35 वा. मुख्यमंत्री फडणवीस हॉटेलमधून निघाले.
भेटीत राजकीय चर्चा
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत राजकीय चर्चाच झाली असणार यात शंका नाही. राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख म्हणाले, "दोन नेत्यांची अनपेक्षित आणि नियोजित नसताना भेट होणं राजकीयच असते. जेव्हा भेट होते तेव्हा राजकारण्यांमध्ये हवा-पाण्याच्या गप्पा नसतात, राजकीय गप्पाच असतात. त्यामुळे याकडे राजकीय अर्थानेच पाहायला हवं. महायुतीकडून यापूर्वी अनेकदा तसे संकेत दिले आहेत की राज ठाकरे यांनी आपल्यासोबत राहावं. मुख्यमंत्र्यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर म्हणाले होते राज ठाकरे यांनी महायुतीसोबत राहावे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करु. राज ठाकरे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत, सभांना गर्दी होते. बाकी त्यांच्या सभांचं मतांमध्ये किती रुपांतर होतं हा विषय वेगळा. पण दोन ठाकरे एकत्र येऊ नये अशी मनोमन इच्छा महायुतीची असणार. कारण एकास एक दोन झाले की राजकीय जी चर्चा होते ती आपण गेले काही दिवस पाहात आहोत. त्यामुळे महायुतीची मनोमन इच्छा असेल की राज यांनी महायुतीसोबत यावं किंवा अलिप्त राहावं. कदाचित त्याबाबत चर्चा असू शकतो", असं रवीकिरण देशमुख म्हणाले.
संदीप देशपांडे भेटीसाठी उदय सामंतांच्या बंगल्यावर
दरम्यान, एकीकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असताना, तिकडे दुसऱ्या भेटीने लक्ष वेधलं. मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी दाखल झाले. या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र,एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होत असतानाच शिवसेनेच्या नेत्यांबरोबर देखील मनसे नेत्यांची बैठक होत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकानं दिले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका येत्या 3-4 महिन्यात जाहीर होत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे आपल्यासोबत राहावी यासाठी महायुती प्रयत्नशील आहे.
एकीकडे महायुतीचे नेते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थावर जात असताना, राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात, उद्धव ठाकरेंसोबतचे वाद महाराष्ट्रापेक्षा मोठे नाहीतम, असं म्हणत युतीचे संकेत दिले. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनीही मी सुद्धा मतभेद विसरायला तयार, मात्र महाराष्ट्रद्वेषी लोकांसोबत संबंध तोडावे अशी अट घातली. दोन्ही नेत्यांनी युतीचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्तेही लगोलग कामाला लागले. कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन भेटीगाठी घेतल्या, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एकत्र होर्डिंग उभे केले.
Raj Thackeray-Devendra Fadnavis meeting VIDEO news : राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट
संबंधित बातम्या