Nana Patole on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केलंय. भारतानं पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आधीच माहिती दिल्यानं, पाकिस्ताननं आपली माणसं त्या ठिकाणाहून हटवली, असंही नाना पटोले म्हणाले. तसंच व्यापारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलं, असा दावाही पटोलेंनी केलाय. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरून प्रतिक्रिया पुढे येत आहे.
मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता म्हणजे नाना पटोले: चंद्रशेखर बावनकुळे
‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही? असा संतप्त सवाल भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उपस्थित केला आहे.
या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे
नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि ‘भारत माते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे. असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून नाना पटोलेंच्या या वक्तव्यावर भाष्य केलंय.
इंदिरा गांधीप्रमाणे आक्रमक भूमिका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नाही- रोहित पवार
ऑपेशन सिंदूरबद्दल आम्ही केंद्र सरकार सोबत आहोत. मात्र भारतीय जनता पक्ष ऑपरेशन सिंदूरचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहे. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षच्या भूमिकेमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. 1971 मध्ये इंदिरा गांधी यांनी जशी आक्रमक भूमिका अमेरिकेच्या विरोधात घेतली ती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिसली नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या