पंढरपूर: काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पंढरपुरातील काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भगीरथ भालके हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले तर पंढरपुरातून काँग्रेसला आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाटेवर जाण्यासाठी भगीरथ भालके यांनी पंढरपुरात आपल्या कार्यकर्ते व माजी नगरसेवकांसह शिवसेना मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन सत्कार केला. विशेष म्हणजे यावेळी भाजपाच्या प्रशांत परिचारक यांचे निकटवर्तीय नागेश भोसले हे देखील उपस्थित होते.
भगीरथ भालके गटाची पंढरपूर विश्रामगृह येथे बैठक सुरू होती. भालके गटाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले पंढरपूर विश्रामगृहावर पोचल्याचे समजतात भगीरथ भालके यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत गोगावले यांचा सत्कार केला. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यावर भालके यांनी शिवसेनाप्रवेशाबाबतची चर्चा नाकारली आहे.
गेल्या काही दिवसापासून भालके काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, इथे भालके यांनी ऐनवेळी शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आघाडीत बिघाडी झाली होती. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट दिल्लीमधून भगीरथ भालके यांच्यासाठी तिकीट आणले. मात्र ही जागा शरद पवार गटाची असल्याने पवार गटाने येथे आरोग्यमंत्र्यांचे पुतणे अनिल दादा सावंत यांना उमेदवारी दिली होती. या तिरंगी लढतीचा फायदा भाजप आमदार समाधान आवताडे यांना होऊन अवताडे यांचा विजय झाला होता. सलग दोन पराभवानंतर भालके गट अस्वस्थ असला तरी अद्याप काँग्रेस सोडण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांच्या गटाकडून सांगण्यात आले. असे असले तरी गोगावले आणि भालके यांच्या भेटीने नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.
भारत भालके यांचं निधन झाल्यानंतर 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्पष्ट भूमिका न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आता त्यांनी पुन्हा शिवसेना शिंदे गटाशी जवळीक साधल्याचे चित्र दिसत असल्याने स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकारणात नव्या घडामोडी घडू शकतात. भालके यांच्या पुढील निर्णयाकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे.