मुंबई: जर कुणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा असा हसत-हसत इशारा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिला. राहुल गांधींच्या या इशाऱ्याला मुंबई काँग्रेसच्या वादाची किनार असून पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना राहुल गांधी यांनी इशारा दिला आहे. राहुल गांधी यांच्या इशाऱ्यानंतर पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नसल्याची भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतली आहे. 


गेल्या काही काळापासून मुंबई काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. एकीकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांचा गट आहे, तर दुसरीकडे आमदार भाई जगताप यांच्यासह गायकवाडांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा गट आहे. या दोन्ही गटांकडून दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे एकमेकांच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही गटांनी आज दिल्लीत जावून राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. 


शिकाऱ्याची गोष्ट सांगत नेत्यांना इशारा


पक्षविरोधी कोणी भूमिका घेत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा मुद्दा राहुल गांधींच्या भेटीवेळी एका नेत्याने मांडला होता. त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना शिकाऱ्याची गोष्ट सांगत इशारा दिला. कुणी ऐकत नसेल तर त्याची शिकार करा आणि भिंतीवर टांगा असा इशारा दिला.


राहुल गांधींच्या या इशाऱ्याचा अर्थ आता काँग्रेस नेत्यांना समजला आहे. जर कुणी पक्षविरोधी कारवाई करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा आणि त्याला पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवा असे आदेश देण्यात आले आहेत. 


राहुल गांधी यांच्या आदेशानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांना 4 जूलैला मुंबईत जाऊन हा वाद मिटवण्याचे आदेश दिले आहेत. 


वर्षा गायकडवांच्या विरोधात दिल्लीत तक्रार


मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं असून त्यामध्ये मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली आहे. वर्षा गायकवाड मनमानी करत आहेत, कुणाला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. नसीम खान, भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे, सुरेश शेट्टी यांच्यासह मुंबईतील काही नेत्यांनी ही तक्रार केली आहे. 


ही बातमी वाचा: