Lok Sabha Election 2024: नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभेचं मैदान मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 20 मे रोजी पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. अशा परिस्थितीत रायबरेलीमधून (Raebareli) निवडणूक लढवत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी प्रचारासाठी जिल्ह्यात एका सभेला संबोधित केलं. येथे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi) काहीही बोलून घेण्याची जादुई शक्ती असल्याचा दावा केला. हा जादुई जिन्न जरी दिसत नसला, तरिही अत्यंत प्रभावशाली असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदींकडून मी काहीही वदवून घेऊ शकतो : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काहीही बोलून घेण्याची ताकद माझ्यात आहे, असं राहुल गांधींनी मंचावरुन सांगितलं. "मी म्हणालो की, नरेंद्र मोदी कधीही अंबानी आणि अदानी यांचं नाव घेत नाहीत. दोन दिवसांनी त्यांनी अदानी, अंबानी यांची नावं घेतली. मग मी म्हणालो की, आम्ही बँक खात्यात पैसे जमा करू, खट-खट. नरेंद्र मोदींनी त्यानंतर आपल्या भाषणात उल्लेख केला 'खटा-खट'.
तुम्हाला मोदींकडून काय ऐकायचंय? मी ते दोन मिनिटांत पूर्ण करेन : राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले की, "मला सांगा तुम्हाला नरेंद्र मोदींकडून काय ऐकायचं आहे? मी ते दोन मिनिटांत पूर्ण करेन आणि जर तुम्हाला मोदींनी काहीच बोलू नये असंही वाटत असेल, तर मी तेदेखील पूर्ण करेन. राहुल गांधी म्हणाले की, मोदी आपला पराभव स्वीकारत आहेत. 4 जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, हे मी लिहून देतो."
राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या जागेच्या विद्यमान खासदार सोनिया गांधी या याच वर्षी फेब्रुवारीमध्ये राज्यसभेत दाखल झाल्या. राहुल गांधी आपली दुसरी लोकसभा जागा म्हणून अमेठीची निवड करतील अशा चर्चा सुरू होत्या. पण त्यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, राहुल गांधी केरळमधील वायनाड येथूनही निवडणूक लढवत आहेत. ही जागा त्यांनी 2019 मध्ये जिंकली होती. सात टप्प्यातील मतदानाच्या पाचव्या फेरीत 20 मे रोजी अमेठी आणि रायबरेलीमध्ये निवडणुका होणार आहेत.