Gulabrao Patil On Sanjay Raut: मंत्री मंडळाच्या खाते वाटपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप तुपाशी तर शिंदे गट उपाशी अशी टीका सामनामधून केली होती. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. उंदराला सापडली चिंधी इकडे ठेवू का तिकडे ठेवू या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. खाते वाटपानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
खाते कुणाला कोणते दिले यापेक्षा सर्व खात्यांवर सामूहिक जबाबदारी ही मंत्र्याची असते. मी जरी पाणीपुरवठा खात्याचा मंत्री असलो तरी माझी इतर खात्यांवर जबाबदारी आहे. मंत्र्याची जबाबदारी ही प्रत्येक खात्याच्या प्रत्येक विभागाच्या काम करण्याची जबाबदारी असते, असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. खाते वाटप करताना थोडं इकडे तिकडे झालं असेल, मात्र काही सापडलं नाही, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उंदराला सापडली चिंधी इकडे ठेवू की तिकडे ठेव, असे म्हणत प्रत्यक्ष नाव न घेता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
खाते वाटपात जे खाते मिळाल आहे, त्यावर समाधानी आहात का असे विचारले असता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, मला आधी जे खात होतं, तेच पाणीपुरवठा खात मिळालं आहे. माझे पूर्वीचेच खाते मला मिळाले. त्यामुळे आनंद झाला. माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत 34 हजार गावांना पाणी पाजण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतली आहे. यातून गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद असून निश्चितच समाधानी असल्याचे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला है उस जैसा, या गीताच्या ओळी म्हणत त्यांनी जे खात मिळालं त्याचा आनंद असल्याचं म्हटलं. खाते वाटपात भाजपचा वरचष्मा दिसून येतो आहे, असे विचारले असता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किली करत चष्मा तर मी पण घातला आहे, असे उत्तर दिले. यावर उपस्थित लोकांमध्ये जोरदार हशा पिकला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Wamandada Kardak : महाकवी वामनदादा कर्डक जयंती : नाशिकच्या वडाळा गावात तेवतोय समतेचा दिवा!
Nashik News : मालेगाव ध्वजारोहण सोहळ्यातच ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न, दोन वर्षांपासून पोलिसांकडे बिल थकीत