Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सवेंदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव (Malegaon) शहरात ध्वजारोहणप्रसंगी सर्वाना अचंबित करणारा प्रसंग घडला. ध्वजारोहणाचा आलेल्या नागरिक, अधिकाऱ्यांसह सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. वेळीच पोलिसांनी सावधगिरी बाळगल्याने पुढील अनर्थ टळला. 


देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या (Independance Day) उत्साहाचे वातावरण आज सकाळच्या सुमारास सर्वच ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले. त्याच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रम गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात सुरु आहे. आज सकाळी मालेगाव येथे ध्वजारोहण सुरु होण्यापूर्वी ठेकेदाराने आत्मदहन (Self Immoltion) करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ध्वजारोहणासाठी उपस्थित सर्वांचेच धाबे दणाणले होते. मात्र पोलीस इतर प्रशासनाच्या समयसूचकतेमुळे अनुचित प्रकार होण्यापासून थांबविण्यात आले. 


मालेगावमध्ये पोलीस परेड ग्राउंडवर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच राजू मोरे याने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या नागरिकांच्या व पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत आत्मदहनाचा प्रयत्न विफल केला. या प्रकाराने कॉलेज मैदानावर काही काळ खळबळ उडाली होती. करोना काळात बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांच्या भोजनासह संपूर्ण शहरात मंडप, लाईट ध्वनीक्षेपक, पाणी, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा पुरविण्याचा ठेका राजू मोरे सुनील मगनराव मोरे यांना देण्यात आला होता. या सुविधांसाठी मोरे यांनी 93 लाख 95 हजार 547 रुपयांचे बिल जमा केले होते.


दरम्यान अनेक वेळा मागूनही त्यांच्या पदरी बिल काही पडत नव्हते. अशातच कुटुंब कस चालवायचं, घरखर्च कसा करायचा या विवंचनेत असताना नैराश्यात गेले. आज सकाळी स्वातंत्र्यदिनानिमित्त कॉलेज मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला.हा प्रकार लक्षात येताच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. करोना संकटात पुरविलेल्या सुविधांचे पैसे आपल्याला दिले जात नाही. दोन वर्ष उलटल्याने विविध आर्थिक अडचणी आपल्यासमोर उभ्या टाकल्या आहेत. शासनाकडे निधी आला आहे. परंतु तो मला दिला जात नाही. त्यामुळेच आत्मदहन करून स्वतःचा जीव संपविण्याचा प्रयत्न आपण केल्याचे मोरे यांनी सांगितले.


म्हणून आत्मदहनाचा प्रयत्न 
करोनाकाळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या सुविधा तसेच पोलिसांना भोजन पुरविण्याचे काम मोरे यांनी केले होते. या सर्व कामाचे 93 लाख 95 हजार 547 रुपयाचे बिल झाले होते. मात्र दोन वर्ष उलटले व करोना नियंत्रणात येऊन सुद्धा मोरे यांना बिल अदा करण्यात आलेले नाही. ठेक्याचे बिल मिळत नसल्याने विविध आर्थिक अडचणींना मोरे यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे थकीत बिल मिळावे यासाठी ते सातत्याने अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते. थकीत बिल अदा केले जात नसल्याने मागणी करून वैतागलेल्या ठेकेदाराने आज ध्वजारोहण प्रसंगी कॉलेज मैदानावर आत्मदहनाचा प्रयत्न केला.