नागपूरः देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पक्षातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. गोवा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक व महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तिरंगा यात्रा सुरू करण्यापूर्वी दिक्षाभूमीवर पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर रॅलीची सुरुवात झाली. जनता चौक - व्हरायटी चौक - बर्डी मेन रोड - लोहापुल - आगारामदेवी चौक - वैद्यनाथ चौक - मेडिकल चौक - क्रीडा चौक - कमला नेहरू कॉलेज - सक्करदरा चौक - तिरंगा चौक - मंगलमूर्ती लॉन - जगनाडे चौक - रेशीमबाग चौक - श्री संत गुलाबबाबा सेवा आश्रम, ग्रेट नाग रोड, सिरसपेठ, लोकांची शाळा जवळ समाप्त झाली.
निशुल्क शिक्षण अन् आरोग्य प्रत्येक नागरिकाचे हक्क
रॅलीदरम्यान आप महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष जगजित सिंग यांनी ठिकठिकाणी सर्वसामान्यांना प्रबोधन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. रॅलीत शेकडो कार्यकर्ते देशभक्तीपर गाण्यांवर थिरकले. रॅलीदरम्यान 'वंदे मातरम', 'भारत माता की जय'च्या घोषणाही देण्यात आल्या. रॅलीमध्ये आप कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचीही उपस्थिती होती. रॅलीनंतर संत गुलाबबाबा सेवा आश्रम येथे आम आदमी पार्टी विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला आपचे राज्य निवडणूक प्रभारी महादेव नाईक यांनी दिल्ली मॉडेल महाराष्ट्रातील गल्लीबोळात नेणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी सर्व निवडणुका लढवणार असून दिल्ली प्रमाणेच विदर्भातील नागरिकांनाही वीज, पाणी, दर्जेदार शाळा तयार करणार असल्याचे सांगितले. नगर पंचायत, नगरपरिषद व महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Independence Day 2022 : आधी भारताकडून क्रिकेट खेळायचे, पण फाळणीनंतर पाकिस्तानकडून खेळू लागले, हे तीन क्रिकेटर माहित आहेत का?
नागरिकांसमोर फक्त 'आप' पर्याय
गेल्या तीन दिवसात राज्यातील सर्व विभागांमध्ये पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भातील शहरांसह ग्रामीण भागातही पक्षाचा विस्तार आणि पक्षाचे विचार पोहोचविण्याचा आप पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला. आपने निवडणूकीच्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करुन विकासाचा खरा मॉडेल दिल्लीमध्ये साकार करुन दाखवला आणि पंजाबही आता विकासाच्या वाटेवर गतीमान पद्धतीने पुढे जात असल्याचे बघून सामान्य नागरिकही यामध्ये सामिल होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आता राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, त्याचा पर्याय फक्त आम आदमी पक्ष आहे असल्याचेही मान्यवरांनी बैठकीत सांगितले.
National Lok Adalat : 32 पॅनल, 7040 खटले निकाली, राष्ट्रीय लोक अदालतीला प्रतिसाद
विदर्भातील प्रत्येक निवडणूकीसाठी पक्ष सज्ज
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असताना जनतेला उत्तम शिक्षण, आरोग्यसेवा, मोफत पाणी आणि वीज उपलब्ध करून देऊन अमृत महोत्सवाचा आनंद साजरा करण्याची संधी प्रत्येक नागरिकाला देऊ अशा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी महाराष्ट्रात संघटना विस्तार कार्याची माहिती दिली. विदर्भातील सर्व निवडणुका आम्ही तयारीनिशी लढू आणि जिंकू, असा दावा आपचे विदर्भ अध्यक्ष डॉ.देवेंद्र वानखेडे यांनी केली. यासाठी आमचे सर्व अधिकारी आपापल्या जिल्ह्यात परिश्रम घेत आहेत. येत्या निवडणुकीत त्याचा नक्कीच फायदा होईल. आजच्या बैठकीत नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विशेषत: राज्य युवा संयोजक अजिंक्य सिंदे, राज्य कोषाध्यक्ष जगजित सिंग, राष्ट्रीय परिषद सदस्य अंबरीश सावरकर, अशोक मिश्रा, सचिव अविनाश श्रीराव, सहसचिव डॉ.केशव बांते, विदर्भ आरोग्य शाखा प्रमुख डॉ. जाफरी, किसान आघाडीचे प्रमुख मनोहर पलवार, युवा राज्य समिती सदस्या कृतल आकरे यांनी परीश्रम घेतले.