Wamandada Kardak : 'सांगा आम्हाला बिर्ला, टाटा कुठाय हो? सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो?' अशा त्वेषपूर्ण शब्दात समाजाच्या विषम व्यवस्थेला सवाल करणारे शाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीच्या सुवर्ण कालखंडातील बिनीचे शिलेदार महाकवी वामनदादा कर्डक (Mahakavi Wamandada Kardak) यांची आज जयंती.
नाशिक (Nashik) म्हटलं आजही अनेक लेखक, कवी, साहित्यिकांची नावे डोळ्यासमोर येतात. त्याचप्रमाणे नाशिक शहरातून दलित चळवळ (Dalit Movement) बुलंद अनेकांनी प्रयत्न केले. कुणी आंदोलनातून, कुणी मोर्चातून यात एक नाव अग्रभागी घ्यावे लागेल ते म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक हे होय. आंबेडकरी चळवळीमध्ये समाजप्रबोधनासाठी योगदान देणाऱ्या लोककवी, शाहिरांमध्ये सिन्नर तालुक्यातील देशवंडी या छोट्याशा खेड्यातील भूमिपुत्र असणाऱ्या वामनदादांचे स्थान अव्वल आहे. या चळवळीचा सुवर्ण कालखंड त्यांच्यासारख्यांच्या योगदानाने तेव्हा झळाळून निघाला होता.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) मधील देशवंडी या छोट्याशा खेड्यात वामनदादांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 ला झाला. वामनदादांचे कुटुंबही मोठं असल्याने त्यांना शेतीही तितकीच होती. वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता. मुंबईत आल्यावर दादा समता सैनिक दलात सामील झाले. एकदा लेझीम चालू असताना एक अशिक्षित माणूस दादांकडे एक पत्र घेऊन आला आणि म्हणाला, "दादा एवढं पत्र वाचून दाखवा" त्या पत्राकडे बघून दादांना रडू अनावर झाले. आपण केवळ नावाचे मास्तर आहोत आपल्याला धड लिहिता वाचताही येत नाही याचे त्यांना अपार दुःख झाले. त्यावेळी कामगार कल्याण केंद्राचे प्रमुख देहलवी यांना दादांच्या रडण्याचे खरे कारण समजले तेव्हा त्यांनी दादांना धीर दिला आणि त्यांना लिहायला, वाचायला शिकवले.
सुरवातीला दादांनी 'वाटचाल' आणि 'मोहोळ; असे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यानंतर 'सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठे हाय हो, सांगा धनाचा साठा न आमचा वाटा कुठे हाय हो' अशा कवनांनी साम्राज्यशाहीला वामनदादांनी आव्हान दिले होते. सन 1920 ते 1956 हा आंबेडकर चळवळीचा कालखंड होता. या कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर वामनदादांनी फिरून समाजजागृतीचे काम केले होते. बाबासाहेबांबरोबर फिरत असताना आपल्या कवनांनी वामनदादांनी सपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
नाशिक अन वामनदादा कर्डक
वामनदादा कर्डक यांचा जन्म सिन्नर तालुक्यातील. मात्र वामनदादा हे कुटुंबियांच्या हलाखीच्या परिस्थिती मुले महाराष्ट्रभर फिरत राहिले. कधी मुंबई, तर औरंगाबाद तर कुढी परभणी अशा विविध ठिकाणी काम करून त्यांनी सुरवातीची वर्ष काढली. मात्र नंतरच्या काळात त्यांनी नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा विचार केला. आजही नाशिकच्या वडाळा गावात वामनदादा कर्डकांच्या आठवणींनी भरलेले घर पाहायला मिळते. याच घरातून त्यांनी असंख्य गाणी लिहली. दलित चळवळ बुलंद केली.
चार हजाराहून अधिक गीते...
अखिल मानवमुक्तीसाठी लढा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा एक सजग प्रहरी, चळवळीचा एक डोळस साक्षीदार म्हणून वामनदादांकडे बघावे लागेल. त्यांनी आपल्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर असंख्य कविता व गीत रचना केली. चळवळीतील गीते, लोकगीते, चित्रपट गीते अशी असंख्य गीते त्यांनी लिहून काढली. जवळपास तीन हजाराहून गीतांचा संग्रह वामनदादांचा होता. लोकभाषेत आकलन सुलभ रचना सादर केल्या, तद्वतच बहिष्कृत मानवतेचे दुःखही तितक्याच सजगपणे उद्धृत केले. ते गायला लागले की ,श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत. मानधनासाठी त्यांनी कधीही हट्ट धरला नाही. उलट, मिळेल त्या बिदागीवर कधी- कधी तर फुकटातच कार्यक्रम सादर केले.