Punjab Politics: पंजाबमध्ये काँग्रेस आता नवज्योतसिंग सिद्धूच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमू शकते. एबीपी न्यूजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि सिद्धू यांना आपापसात बसून हा मुद्दा मिटवावा लागला होता, पण सूत्रांनुसार, नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांच्या जागी दुसऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची भेट घेतल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आपला राजीनामा मागे घेतील अशी अपेक्षा होती. परंतु, सिद्धू यांनी अद्याप तसे केले नाही. दुसरीकडे, त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे पक्ष नेतृत्व सिद्धू यांचा राजीनामा स्वीकारुन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद दुसऱ्या कोणाकडे सोपवण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सिद्धू यांनी ट्विट करून म्हटले होते की, माझ्याकडे पद असेल किंवा नसेल, मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. सिद्धूबाबत निर्णय जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी या संदर्भात राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नाराजीला न जुमानता काँग्रेस हायकमांडने 18 जुलै रोजी सिद्धू यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. वाद थांबत नसल्याचे पाहून 18 सप्टेंबर रोजी अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर, चरणजीत सिंह चन्नी यांनी 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चन्नी सिद्धूचे जवळचे मानले जातात. मात्र, 28 सप्टेंबर रोजी सिद्धू यांनी चन्नी सरकारच्या निर्णयांवर नाराज झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.