कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) कायम राहणार का त्यांना आपली खूर्ची सोडावी लागणार याचा आज फैसला होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघाची मतमोजणी सुरु असून काही तासातच दीदींचे भवितव्य काय याचा निर्णय लागणार आहे. 


सुरुवातीला पोस्टल बॅलेटमधून झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीत एकूण 21 राऊंड आहेत. येत्या एका तासात मतमोजणीचे आकडे समोर येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भवानीपूर मतदारसंघाबरोबरच शमशेरजंग आणि जंगीपूर मतदारसंघासाठी मतमोजणी सुरु आहे. 


भवानीपूर मतदारसंघासाठी 57 टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि सीपीएमचे श्रीजीव विश्वास यांचे आव्हान आहे. 


पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला. यामध्ये तृणमूलला घवघवीत यश मिळालं असलं तरी ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतरही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या ममता बॅनर्जी या विधानसभेच्या सदस्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर सहा महिन्याच्या आत त्यांना विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे.  त्यामुळे त्यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघातून म्हणजे भवानीपूरमधून निवडणूक लढवण्यास प्राधान्य दिलं. या ठिकाणचे आमदार सोभन देव चटोपाध्याय आता खरदाह विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या आधी भवानीपुरातून दोन वेळा विजय प्राप्त केला आहे.


महत्वाच्या बातम्या :